चहाच्या दुकानात गर्दी
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील विविध चौकांमध्ये चहाचे मोठमोठे स्टाॅल लागले आहेत. यामध्ये नागरिक चहा पिण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रपुरातील समाजमंदिर दुर्लक्षित
चंद्रपूर : शहरातील काही भागांमध्ये समाजमंदिर बांधण्यात आले आहेत. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्यामुळे सध्या येथे केरकचरा साचला आहे. त्यामुळे समाजमंदिराला महापालिकेने आपल्या अधिनस्त घेऊन विकास करावा, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील अतिक्रमण ‘जैसे थे’
चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर मार्गावरील जनता काॅलेज चौक ते वडगावपर्यंत रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले असून, सध्या डांबरीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून ठेवल्यामुळे रस्ता ‘जैसे थे’ दिसत आहे. त्यामुळे येथील अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वीज बिलामुळे ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : लाॅकडाऊनमध्ये अनेक ग्राहकांनी वीज बिल थकविले होते. दरम्यान, आता बिल भरण्यासंदर्भात महावितरणकडून वारंवार सूचना केल्या जात आहेत. त्यामुळे बिल भरणे ग्राहकांना कठीण जात आहे. विशेष म्हणजे, राजकीय नेत्यांनी आश्वासन दिल्यामुळे अनेकांनी बिल थकविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनसारखी स्थिती आहे. असे असले तरी काही व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत आपले व्यावसाय सुरू ठेवत आहेत. विशेष म्हणजे, गर्दीवर कोणतेही नियंत्रण नसून मास्क, सॅनिटायझरसुद्धा वापरताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
शौचालयाअभावी नागरिकांना त्रास
चंद्रपूर : येथील संत कवरराम चौक, तसेच सिंधी काॅलनी परिसरात एाही सार्वजनिक शौचालय नसल्याने येथील व्यावसायिक, तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेने येथे सार्वजनिक शौचालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे.
फायबर गतिरोधक बदलावे
चंद्रपूर : येथील हुतात्मा स्मारकाजवळील रस्त्यावर फायबर गतिरोधक लावण्यात आले आहे. मात्र, यातील काही तुटले आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथे नव्याने फायबर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी केली जात आहे.
दिशादर्शक बोर्ड तुटला
चंद्रपूर : लाखो रुपये खर्चून चंद्रपूर शहरातील विविध रस्त्यांवर मोठमोठे दिशादर्शक, गाव तसेच अंतर असलेले बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र, यातील अनेक बोर्ड तुटले असून, यामुळे बाहेरील नागरिकांना चुकीचा संदेश जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
नि:शुल्क वाहनतळ निर्माण करावे
चंद्रपूर : विविध भागांत वाहनतळ नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने शहरात वाहनतळ निर्माण करण्याची नागरिकांची मागणी आहे.