आशिष देरकर लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : गेल्या ३ महिन्यांपासून शासनाकडून मुरुम काढण्याचे परवाने देण्यात न आल्याने पूल व रस्ते बांधकाम प्रभावित झाले आहे. मुरुम नसल्यामुळे कंत्राटदारांना कामे आरामशीर करण्याची संधी मिळाली असून जनतेचे मात्र हाल सुरू आहेत.जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोठमोठ्या रस्त्यांची कामे सुरू असून रस्त्यांचे रुंदीकरण सुरू असल्यामुळे जुने पूल पाडून नवीन पुलांचे बांधकाम सुरू आहे. पुलांमध्ये किंवा रस्त्याच्या कामांमध्ये भरणा भरण्याकरिता मुरुमाची प्रचंड प्रमाणात आवश्यकता आहे; मात्र शासनाकडून मुरुम काढण्याचे परवाने देण्यात येत नसल्यामुळे पावसाळ्यापूर्वी निर्माणाधीन पुलांची कामे होणे शक्य नसल्याचे चित्र आहे. असे झाल्यास पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटू शकतो. त्यामुळे शासनाने मुरूम काढण्याची तात्पुरती परवानगी देऊन कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी गौण खनिजाचे अवैध उत्खनन व चोरी होत असल्यामुळे शासनाने नियम कठोर केले आहेत. कंत्राटदरांकडून बांधकामात अवैध वाहतूक व गौण खनिजाची चोरी करताना आढळल्यास महसूल विभागाचे अधिकारी वाहन जप्तीची कारवाई करून प्रचंड शुल्क आकारतात. त्यामुळे चोरीवर आळा बसला आहे; मात्र रीतसर परवानगी देऊन मुरूम उपलब्ध करून दिल्यास पुल व रस्त्यांच्या कामाला गती येईल. मात्र शासनाचे धोरणच शासकीय कामात अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.
तात्पुरते परवाने द्यावेशासनाकडून ज्या कामांना मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे किंवा ज्या रस्ते व पुलांची कामे सुरू आहेत अशा कंत्राटदाराला त्या रस्त्याकरिता त्याचे अंदाजपत्रक व कार्यारंभ आदेश तपासून तात्पुरता परवाना देणे आवश्यक आहे. रस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल.
अपघातात वाढजिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने वर्दळीकरिता रस्ते चांगले नाहीत. त्यामुळे अनेक अपघात घडले असून अपघातांवर आळा घालण्यासाठी रस्त्यांची कामे तत्काळ होणे आवश्यक आहे.