मूल : मूल शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था बघता नगरविकास मंत्रालयाने ५ मार्च २०१९ च्या आदेशानुसार ६ कोटी २८ लाख रुपये मंजुरीचे पत्र मूल नगर परिषदेला देण्यात आले होते. त्यानुसार प्रभाग क्र. ६ व ७ मधील रस्ते व नाल्यासाठी असलेल्या या निधीपैकी साडेपाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले. सदर काम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल यांना नगर परिषदेने काम करण्यास सांगितले. निधी असतानादेखील मागील वर्षभरापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे ही कामे थंडबस्त्यात पडली आहेत.
मूल शहरात रस्ते व नाल्याची दुरवस्था बघता ती कामे तत्परतेने होण्याच्या दृष्टीने तत्कालीन अर्थ व नियोजनमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष निधी देऊन मूल शहराला विविध विकासकामे करण्यासाठी विशेष प्रयत्नही केले. शहरातील रस्ते व नाल्या होण्याच्या दृष्टीने नगरविकास मंत्रालयाच्या वतीने ५ मार्च २०१९ च्या आदेशानुसार ३० कोटी रुपये मंजूर केले. यातील शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी १३ कोटी ६४ लाख रुपये व ९ कोटी ५० लाख रुपये प्रभाग १ ते ५ साठी, तर प्रभाग ६ व ७ साठी ६ कोटी २८ लाख रुपये मंजूर केले. सदर काम करण्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग मूल या कार्यालयात सोपविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे रस्ते व नाल्याअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोट
नगर परिषद मूलअंतर्गत प्रभाग ६ व ७ मधील रस्ते व नाल्यांसाठी नगर विकास मंत्रालयाकडून ६ कोटी २८ लाख रुपयांपैकी साडेपाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नगर परिषदेने दिलेल्या माहितीनुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. पुन्हा ३ कोटी रुपये येणार असल्याने त्या निधीची वाट पाहावी लागत आहे. सदर निधी येताच एकत्रपणे निविदा काढता येतील.
-प्रशांत वसुले, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, मूल