कोरपना : तालुक्यातील कुसळ, कन्हाळगाव, खैरगाव, जेवरा या गावातून कोरपना शहराला जोडणारे रस्ते, स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही रखडलेलेच आहे. परिणामी ग्रामस्थ, शेतकरी, शेतमजूर यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सदर रस्ते अद्यापही पूर्ण न झाल्याने या भागातील ग्रामस्थांना अधिकचे अंतर मोजून अन्य मार्गांनी यावे लागते आहे. यात वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करावी लागते आहे. या रस्त्यावर अनेकांची शेती आहे. परंतु जाण्या-येण्यासाठी रस्त्याची अडचण असल्याने पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होते. यातील कुसळ रस्त्याचे काम अर्ध्यावरच थांबल्याने झालेल्या रस्त्याची ही दुरवस्था झाली आहे. जेवरा मार्गाचे खडीकरण होऊन संपूर्ण गिट्टी बाहेर पडली आहे. परिणामी रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. कन्हाळगाव, खैरगाव रस्त्यांच्या कामाचा अद्यापही श्रीगणेशा झाला नाही. त्यामुळे त्याही मार्गावर फरपट सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
बॉक्स
रस्ते झाल्यास कोरपना बाजारपेठेला होणार लाभ
हे चारही मार्ग कोरपना मुख्य बाजारपेठेला जोडणारे आहे. त्यामुळे या गावातून येणारे नागरिक थेट बाजारपेठेत कमी अंतरात दाखल होतील. त्या माध्यमातून येथील दुकानात खरेदीच्या निमित्ताने आवक वाढेल.