ब्रह्मपुरी : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील लाॅकडाऊन काळामध्ये रस्त्याचे कामे बंद होती. आता काही ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, गती नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बाजारपेठेत सॅनिटायझर फवारणी करा
सिंदेवाही : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, बाजारपेठ सकाळी ७ ते ११ वाजतापर्यंत सुरू करण्यात आली असल्याने, सॅनिटायझर फवारणी करणे गरजेचे आहे. मुख्याधिकारी नगरपंचायत कार्यालय यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. शहरातील किराणा व भाजीपाल्याची दुकाने बाजारपेठेत आहेत.
चंद्रपूर-मूल मार्गाचे काम अर्धवट
चंद्रपूर : चंद्रपूर येथील मूलकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाचे बांधकाम पुन्हा रखडले आहे. या मार्गाने दिवसभर वर्दळ असते. ही बाब लक्षात घेऊन मार्गाचे बांधकाम लवकर करण्याची मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
राजुरा तालुक्यात जनजीवन विस्कळीत
राजुरा : तालुक्यातील लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. गरीब मजुरांचे हाल होत आहे. काम बंद, दुकान बंद, सर्व बंदमुळे सर्वसामान्यांची गळचेपी होत असल्याची ओरड सुरू झाली आहे.
रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी
सावली : तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. लॉकडाऊन असल्याने रस्ते ओसाड पडले आहेत. त्यामुळे रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव करून कामाला सुरुवात करण्याची मागणी आहे.
सावरदंड चक रस्ता दुरुस्तीची मागणी
ब्रह्मपुरी : तालुक्यातील सावरदंड चक येथे जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गाचे पक्के खडीकरण करण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
भद्रावती तालुक्यात रानडुकरांचा हैदोस
भद्रावती : काही गावांच्या शिवारात जंगली प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकांचे उन्हाळी पीक हाती येत आहेत. या पिकांचे रानडुकरांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रस्त्यावरील अंधार दूर करा
कोरपना : शहरातील वणी, आदिलाबाद, चंद्रपूर या तीन प्रमुख मार्गांवर पथदिवे नसल्याने परिसरात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असते. या मार्गावर पथदिवे लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर पोलीस स्थानक, विश्रामगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तालुका क्रीडा संकुल आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.
रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्या
कोरपना : तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या रुग्णालयात उपचारासाठी कोरपना, जिवतीसह यवतमाळ जिल्ह्यातील व तेलंगणा राज्यातील रुग्ण येतात. सद्यस्थितीत रुग्णालय ३० खाटांचे आहे.
नाल्यातील गाळ काढण्याची मागणी
वरोरा : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने, रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत, शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता आहे. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
बुद्धगुडा गावातील समस्या सोडवा
जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या गावात अजूनही योग्य रस्ते नाही. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा येथील समस्या सोडवाव्या.