पर्यटनाचा प्रयत्न : नागपूर येथील पुरातत्त्व विभागाशी संपर्कमिलिंद कीर्ती ल्ल चंद्रपूरजिल्ह्यातील बल्लारपूर येथील गोंड राजा आदिया बल्लाळशहा यांच्या भुईकोट किल्ल्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्याबाबत बल्लारपूर नगरपरिषद विचार करीत आहे. लोकसहभागातून किल्ल्यात बगिचा व इतर बाबी तयार करण्यात येणार आहेत. हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असल्याने नागपूर येथील कार्यालयाकडे संपर्क करण्यात आला आहे. या संदर्भात ४ जुलै रोजी चर्चा करण्यात आली.गोंड सैनिक जमा करून पहिल्या गोंड सुलतानाने राजावर हल्ला केले. त्या युद्धात राज्याचा काही भाग जिंकला. त्यानंतर आंध्र प्रदेशातील शिरपूर येथे राजधानी बनवून महाल बांधला. मात्र मध्यवर्ती ठिकाण म्हणून आदिया बल्लाळशहा याने बल्लारपूर येथे इरई नदीच्या काठावर किल्ला बांधला . आता हा किल्ला मोडकीळ आला आहे. राज महाल भुईसपाट झाला तरी त्या किल्ल्याचा परकोट शाबूत आहे. तसेच राणी महालाचा काही भाग, किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, आतील प्रवेशद्वार, विहीर, घोडबळ (अस्तबल) आदी सुस्थितीत आहे. या किल्ल्याची निगा राखण्याचा प्रयत्न पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.आता बल्लापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी किल्ल्यातील मोकळा भाग पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे ठरविले आहे. या संदर्भात एका विकासकाशी त्यांनी चर्चा केली आहे. मुख्याधिकारी मुद्धा व ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांनी ४ जुलै रोजी पुन्हा या विषयावर चर्चा केली. किल्ल्याचा विकास करण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीची गरज आहे. त्यासंदर्भात नागपूर येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे एका सूत्राने सांगितले.२६ जानेवारीची परेड किल्ल्यातगणराज्य दिन २६ जानेवारी रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यासमोर विविध कवायती आणि सैन्य परेड केली जाते. त्याप्रमाणे बल्लारपूर येथील किल्ला विकसित करण्यात आल्यावर प्रवेशद्वारावर झेंडावंदन करून पोलीस विभाग, होमगार्ड आदींचे जवान आणि एनसीसी, एमसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांची परेड करण्यात येणार आहे. अस्तबल परिसरात दगडाचे स्टेज आहे. तेथे खुले सभागृह तयार केल्यावर पाडवा पहाट हा संगीतमय कार्यक्रम इरई नदीच्या काठावर घेण्याबाबत विचार करण्यात येत आहे.बगिचा विकसित करणारवृंदावन गार्डनप्रमाणे बल्लारपूरच्या किल्ल्यामधील आतील मोकळ्या भागात रॉक गार्डन विकसित केले जाणार आहे. किल्ल्याच्या पुरातत्त्वीय अवशेषांना कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता बगिचा तयार करण्यात येईल. लँडस्केप करून विविध जातीची झाडे आणि विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात येणार आहेत. राणी महालच्या भागात खुले सभागृह तयार केले जाईल.सध्या हा किल्ला विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात येत आहे. पुरातत्त्व विभागाची परवानगी प्राप्त झाल्यावर किल्ला विकसित करण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेच्या आमसभेत मांडण्यात येईल. नगरपरिषदेने मंजुरी दिल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सध्या किल्ल्यातील झाडे-झुडपे साफ करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.-विपीन मुद्धा,मुख्याधिकारी,नगरपालिका, बल्लारपूर.
बल्लारपूरच्या किल्ल्यात रॉक गार्डन होणार
By admin | Published: July 05, 2016 2:02 AM