सुधीर मुनगंटीवार: स्वच्छता उत्सवात २९९ ग्रामपंचायती पुरस्कृतचंद्रपूर : केंद्र शासनाने ग्राम उदय ते भारत उदय हा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला. यामाध्यमातून ग्रामपंचायतींना बळकटी येणार आहे. गावाचे सशक्तीकरण होणार आहे. सरपंचांनी सेवावृत्तीचे धोरण स्वीकारून गावाचा विकास करावा. त्यातून महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ग्रामीण भारत उभा करण्यास सहकार्य करावे. देशाच्या विकासात गावाची भूमिका महत्वाची ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजनव वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी केले. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्यावतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित हागणदारीमुक्त उत्सव, सत्कार समारंभ, शिक्षण विभागाअंतर्गत मिशन नवचेतना कार्यक्रम, पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार आणि जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींना पुरस्कार करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, शिक्षण समितीचे सभापती देवराव भोंगळे, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद सदस्य ब्रिजभूषण पाझारे, चंद्रपूर पंचायत समितीचे बंडू माकोडे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी रविंद्र मोहिते, प्रदीप सिरसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात हागणदारीमुक्त तालुका करून बल्लारपूर पंचायत समितीने विदर्भात प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल संवर्ग विकास अधिकारी बी.बी.गजबे, उपसभापती अनेकश्वर मेश्राम, पंचायत विस्तार अधिकारी अमोल उघडे तर ब्रह्मपुरी पंचायत समितीने पंचायत राज सशक्तीकरण अभियानात केंद्राचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सभापती नेताजी मेश्राम यांच्यासह अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे नवचेतना उपक्रमात सहभागी केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.प्रास्ताविक मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी तर संचालन कल्पना बन्सोड यांनी केले. आभार रविंद्र मोहिते यांनी मानले. (प्रतिनिधी)
देशाच्या विकासात गावाची भूमिका महत्त्वाची
By admin | Published: April 30, 2016 1:00 AM