चंद्रपूर : महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने गरजू महिलांना नि:शुल्क शिलाई मशीनचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणामध्ये २० महिला सहभागी झाल्या होत्या. समारोपाच्या दिवशी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना साड्या वितरीत करण्यात आल्या.
कोरोनामुळे अनेकांच्या हाताच रोजगार हिरावला आहे. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण देण्यात आले. क्लबतर्फे ज्ञानदा शिक्षण संस्थेमध्ये मागील वर्षी शिलाई मशीन देण्यात आल्या. क्लबतर्फे प्रशिक्षण घेणाऱ्या महिला येथे जावून शिवणकाम करू शकतात. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर पुन्हा असे प्रशिक्षण राबविण्यात येणार असल्याची माहिती क्लबच्या अध्यक्ष रमा गर्ग यांनी दिली. यावेळी क्लबच्या फाैंडर अध्यक्ष विद्या बांगडे, सचिव पूनम कपूर, शकुंतला गोयल, अशोक गोयल, अमोल पोटुदे, दुर्गा पोटुदे, कल्पना गुप्ता आदी उपस्थित होते.