चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या बाबूपेठ येथील फिटनेस ट्रॅकवर सकाळपासून जिल्हाभरातून वाहनचालक आपल्या वाहनाची फिटनेस करण्यासाठी आले होते. मात्र, चार वाजून गेले तरी वाहन निरीक्षक गोविंद पवार ट्रॅकवर आलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. याबाबत आरटीओंना माहिती होताच त्यांनी तत्काळ दुसरा वाहन निरीक्षक तेथे पाठवला. त्यानंतर त्या चालकांना वाहनाची फिटनेस करून देण्यात आली. मात्र, तप्त उन्हात वाहनचालकांची चांगलीच फजिती झाली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपूरचे फिटनेस ट्रॅक बाबूपेठ परिसरात आहे. येथे ब्रेक टेस्टिंग, योग्यता प्रमाणपत्र देण्यासाठी ट्रॅक बनविण्यात आला आहे. जिल्ह्याभरातून बरेच वाहनचालक सकाळपासून येथे येत असतात. बुधवारी या ट्रॅकवर वाहन निरीक्षक गोविंद पवार यांची ड्युटी लावण्यात आली होती. सकाळी आठ वाजल्यापासून जिल्ह्याभरातील अनेक वाहनचालक आपले वाहन घेऊन फिटनेस करण्यासाठी आले होते. परंतु, चार वाजून गेले तरी वाहन निरीक्षक गोविंद पवार हे ट्रॅकवर आलेच नाहीत. भर उन्हात चालक वाहन निरीक्षकांची प्रतीक्षा करत होते. याबाबत आरटीओ किरण मोरे यांना कळताच त्यांनी लगेच दुसरा वाहन निरीक्षक पाठवून काम करून घेतले. मात्र, तोपर्यंत नागरिकांची चांगलीच फजिती झाली होती. अशा बेशिस्त वाहन निरीक्षकांवर आता काय कारवाई केली जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
आपणाला याबाबत माहिती होताच लगेच दुसरा मोटार वाहन निरीक्षक पाठवून ट्रॅकवर आलेल्या चालकांची कामे करून देण्यात आली. मोटार वाहन निरीक्षक हे पूर्व परवानगीशिवाय कार्यालयात गैरहजर आहेत. याबाबत त्यांना ज्ञापन देण्यात आलेले आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयांना शिस्तभंग कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- किरण मोरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर