नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मंजुरीलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : येथील राजीव गांधी सभागृहामध्ये महसूल अधिकारी संघटनेच्या पुढाकारातून मोफत अभ्यास केंद्र चालविले जाते. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी सदिच्छा भेटीत अभ्यास केंद्राच्या मदतीकरिता भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. नावीन्यपूर्ण योजनेतून केंद्रासाठी सहा लाख ६६ हजार रुपयांचा निधी मंजूर करीत जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता केली आहे.ग्रामीण भागातील युवकांचा स्पर्धा परीक्षेकडे कल वाढावा, या उद्देशातून अभ्यासकेंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरिता आवश्यक असलेल्या पुस्तकांची पूर्तता महसूल अधिकाऱ्यांनी स्वखर्चातून केली. अभ्यासाकरिता येणाऱ्या युवकांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन दिले जात आहे. काही दिवसांअगोदर जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केंद्राला सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी आवश्यक पुस्तके, कपाटे व इतर साहित्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.जिल्हाधिकाऱ्यांनी नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत सहा लाख ६६ हजार रुपये मंजूर केले. ३ लाख २९ हजारांची पुस्तके, २ लाख ८७ हजारांची स्टील बुक रॅक, १० हजारांचा व्हाईट बोर्ड, ४० हजारांचे नोटीस बोर्ड खरेदी करण्यात येणार आहे. या निधीतून अभ्यासकेंद्रात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
अभ्यास केंद्रासाठी साडेसहा लाखांचा निधी
By admin | Published: June 13, 2017 12:34 AM