साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च भागवता यावा यासाठी शासनाने पहिली ते दहावीतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या अंतर्गत शिक्षण विभागाने
जिल्ह्यातील ४१ हजार ४८१ विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये ५ कोटी ८८ लाख ७४ हजार ५०० रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असून यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा मिळणार आहे.
राज्यातील अनुसूचित जमातीतील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी तत्कालीन राज्य सरकारने २०१० मध्ये सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. या योजनेमध्ये पहिली ते चवथीपर्यंत एक हजार रुपये, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना १ हजार ५०० तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना २ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी शाळेमध्ये ८० टक्के उपस्थिती राहणे अनिवार्य आहे. मात्र यावर्षी प्राथमिकचे वर्गच भरले नाही. त्यातच उर्वरित वर्गाचीही पाहिजे तशी शाळाच भरली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षी शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र शासनाने निर्णय घेऊन शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. त्यानुसार आता विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यामध्ये रक्कम जमा केली जात आहे.
बाॅक्स
तालुकानिहाय विद्यार्थी तसेच रक्कम
तालुका विद्यार्थी रक्कम
चंद्रपूर ४१८० ६१,२९,०००
सिंदेवाही ३४७९ ४८,८४,०००
मूल २०५० २९,९४,०००
सावली १७४८ २५,१३,५००
गोंडपिपरी १५२७ २१,५४,५००
पोंभुर्णा १३३३ १८,७८,५००
बल्लारपूर १७८५ २,६४,५००
राजुरा २७१९ ३७,३६,५००
कोरपना ३४७० ४८,५७,५००
जिवती १४२६ १७,०१,०००
चिमूर ६४६८ ९२,३४,५००
ब्रह्मपुरी १०९६ १५,७४,०००
वरोरा ४१२३ ५,८७,८००
नागभीड ३०६९ ४४,०७,५००
भद्रावती ३००८ ४,२८,७००
बाॅक्स
ओबीसी विद्यार्थ्यांची निराशा
मागील दोन वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर करण्यात आले होते. यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कागदपत्रे गोळा करून शाळांमध्ये जमा केले. एवढेच नाही तर बॅंकेमध्ये खातेही काढले. मात्र या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच भेटली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
८० टक्केची अट शिथिल
सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची शाळेमध्ये ८० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. मात्र मागील वर्षभर शाळाच सुरूच झाली नाही. त्यामुळे या अटीमध्ये शिथिलता देण्यात आली असून आता
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरित करण्यात येणार आहे.
बाॅक्स जिल्हा राज्यात अग्रेसर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिष्यवृत्तीच्या सर्व तक्रारी निकाली काढल्या असून यावर्षी म्हणजेच २०२१ मध्ये लाभार्थी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यात अगदी वेळेवर रक्कम जमा केली जात आहे. अशी रक्कम जमा करणारा चंद्रपूर जिल्हा सद्यस्थितीत राज्यात अव्वल असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.
बाॅक्स
अशी मिळेल रक्कम
वर्ग शिष्यवृत्ती
१ ते ४ १,००० रुपये
५ ते ७ १,५०० रुपये
८ ते १० २,००० रुपये
बाॅक्स
तर होणार कारवाई
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून पंचायत समितीकडे शिष्यवृत्ती रक्कम आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आली आहे. ही रक्कम मुख्याध्यापकांच्या खात्यातून विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात एक ते दोन दिवसात जमा करावी लागणार आहे. या कामामध्ये गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांनी दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पत्र शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुख्याध्यापक या कामात गुंतले आहे.
कोट
सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्तीची रक्कम पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आली असून मुख्याध्यापकांकडून ती विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये एक ते दोन दिवसात जमा होणार आहे. यावर्षी या प्रकरणातील सर्व तक्रारींचा निपटारा करीत अगदी वेळेवर विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती जमा केली जात आहे.
- दीपेंद्र लोखंडे
शिक्षणाधिकारी, प्राथमिक