घनश्याम नवघडे
नागभीड : नागभीडसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तपाळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी करापोटी ५३ लाख ८६ हजार ५२९ रुपये थकीत असल्याची माहिती आहे. विविध ग्रामपंचायती व नगर परिषदा वेळेवर कराचा भरणा करीत नसल्याने ही योजना चालवायची कशी, असा प्रश्न तपाळ प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
सन १९९५मध्ये युती शासन सत्तेत आल्यानंतर या योजनेस मंजुरी मिळाली होती. चार वर्षांत या योजनेचे काम पूर्ण करून १९९९मध्ये या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. या योजनेत ब्रम्हपुरी तालुक्यातील ३, तर नागभीड तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे. या योजनेचे संचालन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आहे. या योजनेत समाविष्ट असलेली दोन गावे आता नागभीड नगर परिषदेत समाविष्ट झाली आहेत.
योजना कोणतीही असो, त्या योजनेची यशस्विता लोकांच्या सहकार्यावर अवलंबून असते. नागरिकांनी संबंधीत ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेकडे आणि या स्वायत्त संस्थांनी संबंधित विभागाकडे कराचा वेळेवर भरणा केला, तर योजना चालविण्यास अडचण निर्माण होणार नाही. मात्र, तपाळ पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीत असे होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
बाॅक्स
अशी आहे थकबाकी
पाणी करापोटी तपाळ पाणीपुरवठा योजनेचे ५३ लाख ८६ हजार ५२९ रुपये विविध ग्रामपंचायती आणि नगर परिषदेकडे थकीत असल्याची माहिती आहे. यात नागभीड नगर परिषदेकडे १३ लाख ८९ हजार २४ रुपये, चिखलपरसोडी २ लाख ३१ हजार १६८ रुपये, नवखळा १० लाख १७ हजार ७९२ रुपये, देवटेक १ लाख ४० हजार ९६७ रुपये, बालापूर खुर्द २ लाख १० हजार ४२६ रुपये, मौशी ६ लाख ४१ हजार ३५४ रुपये, ढोरपा २ लाख १६ हजार ५५३ रुपये, चिकमारा ३ लाख ९ हजार ८३७ रुपये, तोरगाव खुर्द ५ लाख ४४ हजार ६७२ रुपये आणि तोरगाव बुज या ग्रामपंचायतींकडे ६ लाख ८४ हजार ७३६ रुपये थकीत असल्याची माहिती आहे.
बाॅक्स
योजनेत नानाविध अडचणी
तपाळ ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेत अनेक कामगार कार्यरत आहेत. त्यांचे वेतन, विद्युत बिल, योजनेची देखभाल दुरुस्ती अशा नानाविध अडचणी या योजनेसमोर आहेत.
नुकतीच झालेली वसुली
नागभीड नगर परिषदेने नुकतीच पाच लाख रुपयांची वसुली अदा केल्याची माहिती आहे. मौशी ग्रामपंचायतीने एक लाख, ढोरपा ग्रामपंचायतीने ६७ हजार, तर तोरगाव खुर्द ग्रामपंचायतीने ५० हजार रुपयांचा भरणा केला असल्याची माहिती संबंधित यंत्रणेने दिली.