मनसेचे अभिनव आंदोलन : मनपा, बांधकाम विभाग व नगरसेवकांचा निषेधचंद्रपूर : नागपूर मार्गावर असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्टँड समोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असताना त्याकडे चंद्रपूर सार्वनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेने दुर्लक्ष चालविले आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. या परिसरातील नगरसेवकांनीदेखील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनपात प्रश्न लावून धरला नाही. मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरसेवकांना रस्त्यावरील खड्डयांची लाज वाटत नसल्याचे पाहून स्वत: महाराष्ट्र नवनिर्मित सेनेने या रस्त्याचे नवनिर्माण करण्याचा निर्णय घेतला. मनसेच्या सैनिकांनी मुरूम टाकून पावसात रविवारी खड्डे बुजविले. या अभिनव आंदोलनामुळे मनसे चर्चेचा विषय ठरली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात १० जुलै रोजी शहरातील प्रमुख चौक व रस्त्यावर पडलेले खड्डे स्वखर्चाने बुजवून महानगरपालिका बांधकाम विभाग व नगरसेवकांचा निषेध करण्यात आला. चंद्रपूर शहरात प्रमुख चौक, रस्त्यावर मोठ्या प्रमामात खड्डे पडलेले आहेत. यात खड्डयांमुळे अपघात घडत असतात. नागरिकांना गैरसोय सहन करावी लागते. सदर खड्डयासाठी दोषी मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरसेवक आहे. या तिघांनी आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडली असती तर जनतेला त्रासापासून मुक्ती मिळाली असती. या विभागांना जाग यावी, यासाठी मनसेने खड्डे बुजाव आंदोलन केले.यावेळी मनपा, नगरसेवक, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी मनसेचे रोडे यांनी केली. बस स्टँन्ड समोरील सिद्धार्थ हॉटेल समोर, तुकूम प्रमुख मार्ग व तुकूम प्रभागात ख्रिस्तानंद हॉस्पिटल रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून मनसे पदाधिकाऱ्यांनी बुजविले. येत्या काळात नगरसेवकांच्या घरासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही रोडे यांनी दिला.आंदोलनात शहर उपाध्यक्ष कपील डंबारे, शहर उपाध्यक्ष बाळा चंदनवार, सर्कल अध्यक्ष सागर निखाडे, तुकूम विभाग अध्यक्ष अंजू लेनगुरे, देवानंद ढेंगणे, आतीश वडते, नितीन बावणे, संदीप अरडे, वासुदेव लेनगुरे, रूपेश पिदुरकर, संदीप आमटे, अजय झनके, सौरभ मेंढुलकर, आकाश गोहणे, उज्वल झुले, आशीष शेंडे, अविनाश आलम, देवानंद कुमरे, प्रीतम कुमरे, मुरलीधर बोडावार, स्वप्नील येनूरकर, मीतेश आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)
रस्त्याचे बुजविले खड्डे
By admin | Published: July 11, 2016 12:53 AM