वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाठराखण : शिवसेनेची दोषींवर कारवाई करण्याची मागणी चिमूर : चिमूरला लागून असलेल्या कोलारा गेटवरून देशी-विदेशी पर्यटक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी येत असतात. मंगळवार हा साप्ताहिक सुटीचा दिवस असल्याने कुणालाही व्याघ्र प्रकल्पात प्रवेश दिला जात नाही. मात्र चिमूर स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया दौलतराव मालवे यांच्यासाठी शासकीय नियम धाब्यावर ठेवून वाहनासह सात लोकांना प्रवेशबंदीच्या दिवशी व्याघ्र प्रकल्पात प्रवेश दिला. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोर झोनचे उपसंचालक यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. २० दिवसांचा कालावधी लोटूनही अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. वरिष्ठ अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख विलास डांगे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अतिसंवेदनशिल आहे. या व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी बघण्यासाठी अनेक नामवंत व्यक्तीसह देशी-विदेशी पर्यटक कोलारा गेटवरून व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करीत असतात. साप्ताहिक सुटी मंगळवारला असते. यावेळी कोलारा गेट बंद असते. याची कल्पना आपणाला नव्हती. मी व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी मंगळवार ३१ मे २०१६ ला दुपारी १२ वाजता कोलारा गेटवर पोहचलो. गेटवरील आरएफओशी चर्चा केली असता मंगळवारला कोणालाही व्याघ्र प्रकल्पात प्रवेश नाही, असे सांगितले. मात्र त्याच वेळेस १२.१५ वाजता चिमूर स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया दौलतराव मालवे या एमएच ३४ एबी १९७२ बोलेरो पिकअप या क्रमांकाचच्या शासकीय वाहनाने सिव्हिल ड्रेस घालून तिथे आल्या. ड्रायव्हर व इतर व्यक्ती मिळून सात लोकांना व्याघ्र प्रकल्पात प्रवेश देण्यात आला. या दिवशी पर्यटनास बंदी असताना खासगी व्यक्तीला एसटीपीएफ कर्मचारी दाखवून १+१+५ अशी कोलारा गेटला नोंद केली आहे. मात्र ड्रायव्हर वगळता त्या गाडीत एकही कर्मचारी नव्हता. फारेस्ट अॅक्टनुसार त्या दिवशी प्रवेशास बंदी असताना एसटीपीएफचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना प्रवेश दिला कसा, असा आरोप डांगे यांनी केला. यापूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करणाऱ्या पर्यटकांनी वन्यप्राण्याच्या शिकारी केल्याच्या घटना घडल्या आहेत. याच प्रकल्पात वाघासाठी फासे मांडणाऱ्यांना वनविभागाने पकडले होते. व्याघ्र प्रकल्पाचे नियम अधिकाऱ्यांना माहिती असताना इतर व्यक्तींना प्रवेश बंदीच्या दिवशी सोबत घेऊन व्याघ्र प्रकल्पाची भ्रमंती केली, ही बाब संशयास्पद आहे. व्याघ्र प्रकल्पाचे परिभ्रमण करून परतीच्या मार्गाने येत असताना ज्या गेटवरून गेले, त्या गेटवरून न येता कोलारा गेटच्या मागील कुटीतून परतले. याही कोलारा कुटीवरून बाहेर येण्यास सक्त मनाई आहे. व्याघ्र प्रकल्पात प्रवेश करणाऱ्यांचा कदाचित वाघाची शिकार करण्याचा उद्देश असू शकतो. असा आरोपही पत्रकार परिषदेतून विलास डांगे यांनी केला आहे. या प्रकरणाविषयीची तक्रार प्रथम भ्रमणध्वनीवरून डीएफओ दीपक खाडे यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर ४ जुलैला दुसरी तक्रार निवेदनासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे (कोर) क्षेत्र संचालक यांना देण्यात आली. तोंडी सूचना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक गरड यांना दिली. तक्रार करून आता २० दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र प्रकरण थंडबस्त्यात असून दडपण्याचा प्रयत्न क्षेत्र संचालकांकडून होत असल्याचा आरोप डांगे यांनी केला आहे. चिमूर स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या प्रिया मालवे यांची पाठराखण करणारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (कोर) झोनचे उपसंचालक कडस्कर व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया मालवे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विलास डांगे यांनी केली आहे. आठ दिवसात कारवाई न झाल्यास शिवसेनतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला युवा सेना तालुका प्रमुख सचिन खाडे, शिवसेना उपयुवा सेना प्रमुख वैभव डांगे, शिवसेना उपतालुका प्रमुख सचिन शेट्टे, शिवसेना उपशहर प्रमुख सुभाष गोठ, रमेश भिलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
व्याघ्र रक्षकाचीच प्रकल्पाच्या नियमांना तिलांजली
By admin | Published: July 28, 2016 1:38 AM