चंद्रपूर : कोरोना संकटामुळे, भारतीय रेल्वेने गाड्यांच्या संचालनामध्ये बरेच बदल केले आहेत. भाग्यनगरी, रामगिरी एक्स्प्रेस दररोज बल्लारशाहकडे येणाऱ्या गाड्या थांबविण्यात आल्या आहेत, पण आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर, भाग्यनगरी, रामगिरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्यात आली आहे परंतु या गाड्या बल्लारशाहऐवजी कागजनगरपर्यंत चालविल्या जात आहेत. यामुळे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. बल्लारशाह येथून भाग्यनगरी आणि रामगिरी गाड्या पुन्हा सुरू करण्याची आणि गोंदिया पॅसेंजर, बल्लारशाह-वर्धा-भुसावळ पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांनी केली आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनासह लोकप्रतिनिधीलाही निवेदन दिले आहे.
भाग्यनगरी, रामगिरी रेल्वे कागजनगरपर्यंत चालविली जात होती. चंद्रपूर जिल्हा रेल्वे प्रवासी असोसिएशन बल्लारशाहच्या माध्यमातून माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्याकडे वारंवार मागणी करून भाग्यनगरी, रामगिरीचा विस्तार बल्लारशाहपर्यंत करण्यात आला. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांनाच नव्हे तर यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांनाही फायदा होत होता. गोंदिया पॅसेंजर आणि बल्लारशाह-वर्धा-भुसावळ या दोन्ही गाड्या प्रवाशांच्या सोयीच्या होत्या. मात्र त्याही बंद करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास करावा लागत आहे.
भाग्यनगरी आणि रामगिरी एक्स्प्रेस कागजनगरऐवजी बल्लारशाहपर्यंत सुरू करण्याची आणि गोंदिया पॅसेंजर आणि बल्लारशाह-वर्धा-भुसावळ पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी झेडआरयूसीसी सदस्य श्रीनिवास सुंचुवार यांनी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून केली आहे.