सुट्या पैशाचा पेच : रेल्वे तिकीट घर व बसमध्ये नोटा स्वीकारणे बंदभारत सरकारने मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५००, १००० रुपयाच्या नोटा बंद केल्या आहेत. त्याचा थेट परिणाम बुधवारी व्यवहारावर दिसून आला. दोन दिवस बँक व एटीएम केंद्र बंद असल्याने ग्राहकांची प्रचंड धावपळ दिसून आली. ज्यांच्याकडे नोटा होत्या, त्यांनी विविध मार्गाने नोटा बदलविण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंपावर ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारले जाणार होते. त्यामुळे बुधवारी सकाळी अनेक नागरिकांना वाहनात पेट्रोल टाकण्याच्या बहाण्यावरून नोटा बदलण्याची तयारी चालविली. यात अनेकांना १०० रूपयाचा पेट्रोल टाकल्यानंतर ४०० रूपये परत दिले जात होते. मात्र काही वेळातच नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी वाढली आणि पेट्रोल पंप चालकाकडील सुट्टे पैसे संपले. सर्व ग्राहकांना सुट्टे पैसे देणे शक्य न झाल्याने पेट्रोल पंप चालकांनी सरसकट पाचशे रूपयाचे पेट्रोल भरण्याची एकप्रकारची अटच घालून दिली. नोटा तर चलनातून बंद झाल्या मग ५०० रूपयाचे पेट्रोल टाकून घेणेच फायद्याचे, असे म्हणत अनेकांनी आपल्या वाहनाची पेट्रोल टँक फुल्ल करून घेतली. काही पेट्रोल पंपावर तर पोलीस बंदोबस्त लावण्याची परिस्थीती उद्भवली. वाहतूक शाखेचे पोलीस अवैध वाहतूक रोखण्यासाठी मूल मार्गावर दिसून आले. मात्र वाहनधारकांकडून चालन कापताना त्याच्याकडे ५०० रूपयाची नोट असल्यास तेही चालन कापण्यास असमर्थ दिसून आले. रेल्वेस्थानकावर सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरून ५०० व १००० रूपयाच्या नोटा स्वीकरणेच बंद करण्यात आले होते. तसा फलकही लावण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाश्यांनी टिकीटासाठी ५०० रूपयाच्या नोटा दिल्या. मात्र वाहकाकडे सुट्टे पैसे असले तरच त्या नोटा स्वीकारले जात होते. पण ज्या प्रवाश्याकडे ५०० च्या नोटाव्यतीरिक्त पैसेच नाही, अशाला त्याची नोट स्वीकारून उतरताना ३ ते ४ प्रवाश्यांचे मिळून पैसे परत केले जात होते. मात्र उतरल्यानंतर सुट्टे पैसे मिळवण्यासाठी प्रवाश्यांची चांगलीच गोची झाली.
नोटा बदलण्यासाठी धावपळ
By admin | Published: November 10, 2016 1:59 AM