बालमृत्यूचे प्रमाण कसे रोखणार?: आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट चंद्रपूर : मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. जन्माला येणारे बाळ सुदृढ व निरोगी राहावे यासाठी आरोग्य संस्थातील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर शासनाचा भर आहे. मात्र आजही ग्रामीण भागातील महिला अनभिज्ञ दिसून येत असून २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील ५८ आरोग्य केंद्रांर्तगत ५४८ महिलांची प्रसुती घरी झाल्याचे आरोग्य विभागाच्या वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम शासनाकडून राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम व इतर आनुषंगीक योजना सुरू आहेत. प्रत्येक गरोदर मातेस प्रसुतीपुर्व, प्रसुती दरम्यान व प्रसूतीपश्चात आरोग्य सुविधा व प्रयोगशाळा चाचण्या व एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकांस प्रयोगशाळा चाचण्या, औषधोपचार योग्यवेळी मोफत उपलब्ध करुन देणे, हे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.मात्र आजही ग्रामीण महिलांमध्ये आरोग्य संस्थांबाबत अनभिज्ञता असल्याने प्रसूती घरीच केले जात आहे. परिणामी बालमृत्यूचे प्रकार घडत आहेत. सन २०१४-१५ या वर्षात ५८ आरोग्य केंद्रांर्तगत ग्रामीण भागामध्ये ३८१ तर शहरी भागातील १६७ अशा ५४८ महिलांची प्रसूती ही घरी झाली आहे. आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती होण्याचा आकडाही मोठा आहे. मात्र आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृती नंतरही घरी प्रसुतीचे प्रमाण आजही पूर्णपणे कमी झालेले नाही. रुग्णालयात गरोदर मातेस व एक वषार्खालील आजारी बालकास मिळणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे व वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी जननी शिशू सुरक्षा योजना सुरु आहे. मात्र याची अनेकांना माहितीच नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
रूग्णालयात प्रसूतीसाठी ग्रामीण महिला मागेच
By admin | Published: February 22, 2016 1:17 AM