राजेश भाेजेकर, लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रत्यक्ष युद्धभूमीपासून ते आहेत अवघ्या २०० किलोमीटर दूरवर. कधी एखादा बॉम्ब आपल्याही डोक्यावर आदळेल, अशी त्यांना भीती आहे. मायभूमीत परत येण्याची त्यांची इच्छा आहे; पण त्यांना जाण्याची परवानगी नाही. ही स्थिती युक्रेनमधील नव्हे, तर रशियात डॉक्टर व्हायला गेलेल्या विद्यार्थ्यांची झाली आहे.
रशियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेले ६५ टक्के भारतीय विद्यार्थी परतण्याच्या मनस्थितीत आहेत. मात्र, तुमची गैरहजेरी लागेल, वर्ष वाया जाईल, अशी भीती कुर्स्क विद्यापीठाकडून दाखवली जात आहे. पंतप्रधानांना उद्देशून ‘मोदीजी, आम्ही फसलोय आम्हाला बाहेर काढा’, असे त्यांनी आर्जव ‘लोकमत’शी बोलताना केले. विद्यार्थ्यांनी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त करून ऑनलाईन क्लासेस घेण्याची मागणी केली. मात्र, विद्यापीठाने त्यास नकार दिला. त्यांची गैरहजेरी लागेल, वर्ष वाया जाईल, अशी भीती दाखविली जात आहे.
कुर्स्क हे शहर सीमावर्ती भागात युक्रेनमधील युद्धग्रस्त खारकीव्हपासून अवघ्या २०० किलोमीटर अंतरावर आहे. या शहरातूनच जेट लष्करी विमाने सकाळपासून घिरट्या घालत उड्डाण घेत असल्याचे बघायला मिळते. मॉस्को आंतरराष्ट्रीय विमानतळ कुर्स्क शहरापासून ५०० किलोमीटर अंतरावर आहे. कुर्स्क शहरावर युद्धाचे सावट असून, युद्ध झाल्यास येथून बाहेर पडताना मोठी अडचण होईल, अशी भीती आहेत.
युक्रेनशी चर्चा सुरूच
युक्रेनशी चर्चा करण्यास रशिया तयार आहे, परंतु त्या देशावर सुरू असलेले हल्ले आम्ही अजिबात थांबविणार नाही, असा इशारा सर्जी लावरोव्ह यांनी दिला आहे. रशियाने आपल्या मागण्या युक्रेनच्या शिष्टमंडळाला दिल्या होत्या. त्यावर युक्रेनच्या उत्तराची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.
रशियात एटीएममध्ये पडला ठणठणाट
- निर्बंधांमुळे रशियाचे चलन रूबलचा भाव घसरला आहे. एटीएममध्ये पैसे नसल्याने कोंडी झाली.
- विद्यापीठाने मतदान घेतले. त्यात ६५ टक्के विद्यार्थ्यांनी भारतात जायचे आहे, असे सांगितले.
- भारतीय दुतावासाने किती विद्यार्थी रशियात शिकत आहेत, ऑनलाईन माहिती गोळा केली.
१०,००००० युक्रेनमधून लोकांचे पलायन
रशियाने आक्रमण केल्यानंतर युक्रेनमधील सुमारे दहा लाख लोकांनी आपला जीव वाचविण्यासाठी इतर देशांत पलायन केले आहे. या शतकातील निर्वासितांचे हे सर्वात मोठे स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. युद्धाच्या आठव्या दिवशी रशियाच्या फौजांनी युक्रेनमधील खारकीव्हवर बाॅम्बहल्ले सुरू ठेवले असून, दोन मोठ्या बंदरांना वेढा घातला आहे.
आपल्या देशाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी युक्रेनचे नागरिक व लष्कर यापुढेही प्राणपणाने झुंज देत राहतील. रशियाच्या सैनिकांना चुकीच्या हेतूसाठी त्यांचे सत्ताधीश वापरून घेत आहेत. - वोलोदिमीर जेलेन्स्की राष्ट्राध्यक्ष, युक्रेन