राजेश मडावी
चंद्रपूर : कोरोनाकाळात भारतातील तांदूळ आयातीला झळ पोहोचल्यानंतर आता स्थिती थोडी पूर्वपदावर आली होती. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे शिपिंग कंपन्यांनी जहाज पाठविणे बंद केल्याने विदर्भातील गैरबासमती (चिन्नोर, श्रीराम कोलम) तांदळाच्या निर्यातीलाही फटका बसला आहे.
कोरोनापूर्वी गैरबासमती तांदळाची निर्यात १३.०८ दशलक्ष टन (एमटी) विक्रमी मालवाहतुकीपेक्षा जास्त झाली होती. जगातील सर्वांत मोठा तांदूळ निर्यातदार असलेल्या भारताने विदेशात ६.६ दशलक्ष टन बासमती तांदूळ पाठवला आहे. भारताच्या तांदळाची एकूण निर्यात ६५,२९७ कोटींवर गेली. भारताने २०१९-२० मध्ये ४५,४२६ कोटींच्या तांदळाची निर्यात केली होती. यात महाराष्ट्रातील विदर्भाचाही वाटा लक्षणीय आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे विदर्भातून या दोन देशांत होणाऱ्या बिगरबासमती तांदूळ निर्यातीलाही फटका बसला आहे. या भागातून या देशांमध्ये १० ते १२ हजार टन तांदूळ जातो, अशी माहिती राइस एक्स्पोर्ट्स असोसिएशन दिली.
कोरोनापूर्वी तांदूळ बाजारात दबदबा
कोरोनापूर्वी तांदूळ आयातीच्या बाजारात भारताचा दबदबा हाेता. १४-१५ दशलक्ष टन निर्यात होऊ शकेल असा अंदाज होता. मात्र युद्धामुळे या निर्यातीलाही अडथळे निर्माण झाले.
पारंपरिक तांदळाच्या मागणीलाही ब्रेक
कृषी संशोधनामुळे बाजारपेठेत तांदळाचे नवीन वाण येत आहेत. परंतु भारतातील पारंपरिक वाणांनाही जगात मागणी आहे, विशेषकरून ११२१ या जातीच्या तांदळाला आखाती देशातून मागणी वाढत होती. युद्धामुळे भारतातील पारंपरिक तांदळाच्या मागणीला ब्रेक लागला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गैरबासमती तांदूळ निर्यातीची प्रचंड क्षमता असूनही पायाभूत सुविधा नाहीत. आम्ही नागपूरच्या व्यावसायिकांना तांदूळ विकतो. तिथून ते मुंबईला विकतात. त्यानंतर जहाजमार्गे हा तांदूळ विदेशात जातो. राईस टेस्टिंग फेल झाल्यास आमच्यावरच आर्थिक भुर्दंड बसताे. अन्य राज्यांच्या तुलनेत विजेचे दर सर्वाधिक आहेत. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात काही प्रमाणात थेट निर्यात सुविधा झाल्या, मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अभाव आहे. आता युद्धामुळे व्यवहारावरही मर्यादा आल्या आहेत.
-जीवन कोंतमवार, सचिव, चंद्रपूर जिल्हा राईस मिल असोसिएशन, चंद्रपूर