राजकुमार चुनारकरचिमूर (चंद्रपूर) : वाघाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या ताडोबात क्रिकेट जगतातील देव सचिन तेंडुलकर शनिवारी सायंकाळी पत्नी अंजली व मित्रासोबत एका खासगी रिसॉर्टमध्ये चौथ्यांदा मुक्कामी आला आहे. सचिनने सोमवारी सकाळी अलिझंझा गेट मधून नवेगाव व निमढेला परिसरात सफारी केली या सफारीत सचिनला निमढेला, रामदेगी परिसरात भानुसखिंडी व तिच्या चार बछड्यांचे दर्शन झाले. त्यात भानुसखिंडी व तिच्या बछड्यांच्या विविध अदानी सचिन व अंजली भारावून गेल्याचा प्रसंग सचिन ने स्वत: व्हिसीट बुकमध्ये नोंद केली आहे.
मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर उमरेडजवळील कराडला येथे व्याघ्र दर्शन करून चिमूर तालुक्यातील कोलारा गेट परिसरातील बांबू रिसॉर्टमध्ये पत्नी अंजली व मित्रासोबत मुक्कामी आला. रविवारी सचिनने सकाळी मदनापूर बफ्फर झोनमध्ये व दुपारी कोलारा कोअर झोनमध्ये सफारी केली. यासफरीत वाघाने सचिनला हुलकावणी दिली असल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले.
सोमवारी सकाळी सचिन व पत्नी अंजली यांनी अलिझंझा बफ्फर झोन गेटमधून सफारी केली. त्यात निमढेला, रामदेगी परिसरात भानुसखिंडी व तिच्या चार बछड्याच्या विविध मुद्रांचे दर्शन झाले हा प्रसंग रोमांचकारी असल्याचे सचिनने स्वत: वनविभागाच्या व्हिसीट बुकमध्ये नोंद केली. तसेच वनविभागाच्या अधिकारी व वनरक्षक यांचे अभिनंदन केले तसेच जंगलात वाघ दाखविण्यासाठी, जंगलाच्या रक्षणासाठी कर्मचारी काम करतात या कार्याची सचिनने तारीफ केली. सोमवारी दुपारच्या सफरीसाठीही सचिन अलिझंझा बफर झोनमध्ये गेले आहेत.