चिमूर (जि. चंद्रपूर) : भल्याभल्यांना ताडोबाच्या वाघाने भुरळ घातली आहे. अनेक सेलिब्रिटी कलावंत, क्रिकेटर वाघाच्या भेटीला ताडोबात येत असतात. अशातच क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली व मित्र परिवार शनिवारी ताडोबात दाखल झाले. एका खासगी रिसोर्टमध्ये त्यांचा मुक्काम असून शनिवारी सायंकाळी ४ वाजता मदनापूर बफर गेटमधून त्यांनी जंगल सफारी केली.
सचिन तेंडुलकर याच वर्षी २६ जानेवारीला कोलारा गेटवर चार दिवस पत्नी व मित्रांसह मुक्कामाने आला होता. तेव्हा कोलारा गेट, अलिझंझा गेट, मदनापूर गेट, बेलारा गेटवरून सफारी केली असता त्यांनी १२ वाघांचे दर्शन घेऊन निरोप घेतला होता. सर्व जण तीन दिवस मुक्कामी असतील.