लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून झळ सुरू असतानाच सर्वत्र मुसळधार बरसल्याने नाल्यांना पूर आला तर, काही नजीकच्या गावांची शुक्रवारी सकाळी तारांबळ उडाली होती. नाल्याच्या पुलावरून पाणी वाहल्याने काही गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. दरम्यान, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदी व नाल्याकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने शेतकरी सध्या सुखावला आहे.विभागीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पावसाची झळ सुरू आहे. सद्यस्थितीत कापूस व सोयाबीन लागवड झाली. भातशेतीचे पऱ्हे टाकण्याचे कामही आटोपले. पह्यांची योग्य वाढल्यास सर्वच शेतकरी रोवणीला सुरुवात करतील. मात्र, त्यासाठी रोवणीला अनुकूल पाऊस पडणे अत्याश्यक आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. सलग तीन-चार दिवसांच्या झळीने नाल्यांना पूर आला. शेतातील बोड्याही आता तुडुंब भरू लागल्या आहेत.
धान उत्पादक तालुक्यांत रोवणी आधीच पऱ्हे टाकलेल्या सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, सावली, पोंभुर्णा व चिमूर तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी रोवणी सुरू केली. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे.
कापूस-सोयाबीन तरारले वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी, जिवती, कोरपना तालुक्यात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी अधिक आहेत. पावसाने कापूस व सोयाबीन अंकूर तरारले. या दोन्ही पिकांत बऱ्याच शेतकऱ्यांनी तूर लावल्याने सध्या तरी पिकांची स्थिती चांगली आहे.
माजरी रेल्वे मार्गावरची माती कोसळली
माजरी : माजरी खदान-माजरी जंक्शन रेल्वे रुळावरची माती कोसळल्याने या रेल्वे मार्गावरून जाणारी कोळसा वाहतूक शुक्रवारी दीड तास ठप्प झाली होती.परिसरात सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास माजरी खदान-माजरी जंक्शन या मार्गावर शिरना नदीच्या पुलानजीक रेल्वे मार्गावरची साईड बंकिंगची माती कोसळली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. सदर मालगाडी पोल क्र. ८४४ आर/१८ जवळ सकाळी ९ वाजेपर्यंत तब्बल दीड तास उभी होती. त्यामुळे अन्य गाड्यांचे वेळपत्रक बदलले.
...तर दुर्घटना घडली असती- कोळसा वाहतूक करणारी मालगाडी लोड घेऊन वणीच्या रेल्वे साइडिंगवरून माजरी जंक्शनच्या दिशेने निघाली होती. दरम्यान शिरना नदीच्या पुलाजवळ रेल्वे मार्गावर साइड बंकिंगची माती कोसळली, अशी माहिती एका नागरिकाने इंजिन ड्रायव्हरला दिली. दरम्यान इंजिन ड्रायव्हरने लगेच सतर्कता दाखवित गाडी थांबविली. घटनेची माहिती मिळताच वणीचे सिनिअर सेक्शन इंचार्ज राजन हिरे,वरोराचे एडीएन राणे हे घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहून मालगाडीला वळविले.