राजकुमार चुनारकरलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वाघांची व इतर प्राण्यांची संख्या वाढल्याने वन्यजीवांना नवीन जंगलात स्थलांतरित करताना वाहतुकीचा अडथळा येऊ नये म्हणून चिमूर-वरोरा रोडवरील चिमूरपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॉरिडॉरवर वन्यजीवांसाठी ४० कोटी रुपयांचा १२०० मीटर लांबीचा अंडरपास (भूमिगत मार्ग) साकारत आहे. बँका कन्ट्रक्शन कंपनीकडून अंडरपासचे युद्धस्तरावर काम सुरू आहे.दिवसागणिक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील जंगल वाघांच्या अधिवासासाठी कमी पडू लागले आहे. त्यामुळे वाघांसह वन्यजीव क्षेत्र बदलत असतात. ताडोबातील वाघ उमरेड तालुक्यातील कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पात भ्रमंती करतात. यासाठी ताडोबालगत असलेल्या चिमूर तालुक्यातील शेंडेगाव ते बंदर गावामधील भागाला वाघांचे कॉरिडॉर म्हणून ओळखले जाते. चिमूर ते वरोरा हा राष्ट्रीय महामार्ग बनल्यामुळे या रोडचे काम सुरू आहे. हा मार्ग राष्ट्रीय बनल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. या वाहनांमुळे वन्य प्राण्यांच्या जीवितास धोका होऊ नये व आवागमनासाठी त्रास होऊ नये म्हणून शासनाने या मार्गावर वन्य प्राण्यांसाठी १२०० मीटर लांबीच्या अंडरपास मार्गाला मंजुरी देत काम सुरू केले आहे.
अपघाताचा धोका टळणारया अंडरपास मार्गामुळे वन्य प्राण्यांना कर्कश हॉर्न, ध्वनी प्रदूषण यापासून मुक्ती मिळणार आहे. अपघाताचा धोकाही टळणार असून, या अंडरपास मार्गामुळे ताडोबातील वाघासह वन्य प्राण्यांना हक्काचा कॉरिडॉर मिळणार आहे.
असा असेल अंडरपास कॉरिडॉरबाराशे मीटरच्या या अंडरपास मार्गात ७५० मीटरचा पूल, तर ४५० मीटरचा उतार मार्ग असणार आहे. या पुलावर ६७ कॉलम व २६ स्पॉन (स्लॅब) आहेत. रोडची रुंदी १६ मीटर असून, ११ मीटरचा कारेंज वे, तर दोन्ही बाजूने अडीच मीटरचे फुटपाथ राहणार आहे.