शंकरपूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्र प्रमुखाचा रजेचा अर्ज असतानासुद्धा चिमूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने वेतन कपात केलेली आहे.
चिमूर पंचायत समिती अंतर्गत टेकेपार केंद्रप्रमुख म्हणून डी. एस. घोनमोडे हे कार्यरत आहे. त्यांच्या मुलीचे लग्न ४ जुलैला असल्याने त्यांनी ४ जुलै ते १० जुलैपर्यंत अर्जित रजा घेतली होती. त्यासंदर्भात पंचायत समितीच्या आवक-जावकला रितसर अर्जसुद्धा त्यांनी सादर केलेला होता. तसेच हिरापूर येथील केंद्र प्रमुख अशोक गायकवाड हे ५ जुलै ते १२ जुलैपर्यंत अर्जित रजेवर होते. परंतु जुलैचा पगार काढताना गटशिक्षणाधिकारी मेश्राम यांनी दोन्ही केंद्रप्रमुखांचे अर्जित रजेचे वेतन कपात केले आहे. अर्जित रजा शिल्लक असतानासुद्धा वेतन कापणे हे केंद्रप्रमुखावर अन्याय असल्याचे त्यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलेले आहे. याशिवाय अर्जित रजा शिल्लक असल्याने हे वेतन कपात करता येत नसल्याचे घोनमोडे व गायकवाड यांचे म्हणणे आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी मेश्राम हे रुजू झाल्यापासून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. अर्जित रजा असतानासुद्धा गटशिक्षणाधिकारी यांनी वेतन कापले, तर दुसरीकडे हिरापूर येथील एक शिक्षिका १ जुलै ते २५ जुलैपर्यंत आजारी रजेवर असतानासुद्धा जुलैचे पूर्ण वेतन काढण्यात आलेले आहे. नियमानुसार आजारी रजेचा अर्ज मंजूर करून ते वेतन पुढील महिन्यात काढायचा असते. परंतु त्यांनी तसे न करता सरसकट जुलै महिन्यात त्यांनी या शिक्षिकेचे वेतन काढलेले आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांचा एकाच शाळेतील दोन शिक्षकांना वेगवेगळा न्याय कसा? असा प्रश निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे मेश्राम हे हेतुपुरस्पर मानसिक त्रास देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केलेले आहे. गटशिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई करावी व कापलेले वेतन देण्यात यावी, अशी मागणी केंद्रप्रमुख डी. एस. घोनमोडे व गायकवाड यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पाठविलेल्या पत्रातून केलेली आहे.
कोट
वेतन रजा मंजुरीसाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले आहे. ते मंजूर होऊन न आल्यामुळे त्यांचा पगार कपात करण्यात आला होता. रजा मंजूर झाल्यानंतर कपात केलेले वेतन देण्यात येईल.
-डी. जी. मेश्राम, गटशिक्षणाधिकारी पं. स. चिमूर