लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: शेतातील पिकांवर किटकनाशकाची फवारणी करताना मागील दोन वर्षांत अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे. काही शेतकऱ्यांना जीवसुद्धा गमवावावा लागला असून, अनेक कृषी केंद्रांमध्ये बंदी असलेल्या किटकनाशकांची सर्रास विक्री होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाभरातील कृषी केंद्रातील चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.चंद्रपूर तालुक्यातील चेक माणकापूर येथील ऋषी मडावी यांचा २८ आॅगस्टला फवारणी करताना मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील येवती येथील मंगेश निकुरे हा संजय चिमूरकर या शेतकºयांकडे नोकर होता. मालकाच्या सांगण्यावरुन ४ सप्टेंबर रोजी कपाशीवर फवारणीसाठी गेला असता काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूर येथे भरती केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोबतच अन्य शेतकऱ्यांनाही विषबाधा झाली आहे. परंतु फवारणी करताना वापरलेले कीटकनाशक कोणत्या कंपनीचे होते व कोणत्या कृषी केंद्रातून खरेदी करण्यात आले याची चौकशी करण्यात आली नाही. जिल्ह्यात बंदी असलेली कीटकनाशके अनेक कृषी केंद्रांमध्ये उपलब्ध असताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, हा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी कृषी केंद्रांची चौकशी करून संबंधित कंपनी व कृषी केंद्र संचालकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना सुरेश रामगुंडे यांच्यासह हिराचंद बोरकुटे, डी. के. आरीकर, डॉ. देव कन्नाके, अॅड. गणेश गिरीधर, रवी ढवस, रवींद्र बोरकर, सूर्यभान झाडे, धननजय जीवने उपस्थित होते.
बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:24 AM