टेमुर्डा : वर्षभर शेतीत राबराब राबायचे. शेतीसाठी बँक, बचत गट, सहकारी संस्था आणि वेळप्रसंगी सावकाराकडून कर्ज घ्यायचे. त्यातून शेती पिकवायची. हाती येणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा, असा जीवनाचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी मात्र चांगलाच फटका दिला. दुष्काळाच्या सावटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक बोझा वाढत आहे. त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांनी आता कवडीमोल भावात गोधन विक्रीला काढले आहे. पशुपालकाचा सखासोबती असलेल्या ढवळ्या-पवळ्याची जोडी असो वा अन्य पशुधनाची विक्री वरोरा, माढेळी बैल बाजारात केली जात आहे. टेमुर्डा परिसरातील ३५ ते ४० गावातील काही शेतकरी आपले पशुधन कसायाच्या हवाली करीत आहेत. कापूस, सोयाबीन, धान उत्पादक म्हणून वरोरा तालुक्याची ओळख आहे. या परिसरात यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना पुरते हतबल केले. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात शेतकरी व पशुपालक अडकला आहे. यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली तो पुरता दबल्या गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगाम पावसाअभावी हातून गेला. निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोर जाता यावे म्हणून बँक, सावकार, बचत गट व हात उसनवारीच्या कर्जाच्या परतफेडीसाठी खरिप हंगामानंतर शेतकरी व पशुपालकांनी आपले पशुधन विक्रीला बाजारात नेले आहे.शेकडो शेतकऱ्यांनी दलाल कसायाला घरीच बोलावून त्या पशुधनाची विक्री केली आहे. पशुधन विकले नाही, तर आपल्यावर कर्जाचा डोंगर वाढत जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. पुढील रब्बी हंगामाचीही आशा मावळली आहे. त्यामुळे चाऱ्याचीही भीषण टंचाई निर्माण होण्याच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी पशुधन विक्रीचा निर्णय घेतला आहे. तर या वरोरा तालुक्यातील अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत तर आधुनिकतेमुळे सर्वत्र ट्रॅक्टरने नांगरणी व मळणी होते. त्यामुळे बैलांनाही आता कामे उरली नाहीत. अशाही स्थितीत शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकटासोबत आधुनिक यंत्रांनी संकट निर्माण केले आहे. शेतीकामात मोठ्या प्रमाणावर आधुनिक यंत्रांचा वापर वाढल्याने पशुधन निकामी ठरत आहे. (वार्ताहर)
कर्जमुक्तीसाठी गोधन काढले विक्रीला
By admin | Published: January 20, 2015 11:10 PM