ब्रह्मपुरी : शहरात अनेक बारमधून मुदतबाह्य दारुची विक्री करण्यात येत आहे. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असून व्यसनी नागरिक आपल्या धुंदीत ती घेत असल्याने भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहरातील रस्त्यावर व मौक्याच्या ठिकाणी अनेक बार आहेत. सायंकाळी बार हाऊसफूल असतात. प्रकाश मंदावलेला असतो. ग्राहक आपल्या धुंदीत असते. अशा स्थितीचा फायदा घेत बारमध्ये सर्रास मुदतबाह्य दारु व सोडा विकल्या जात आहे. शहरात बारची संख्या मोठी आहे. बार चालकांनी जाण्यायेण्याचा रस्ता, वाहनतळाची सोय, परिसरातील नागरिकांना आवाजाचा होणारा त्रास आदी गोष्टींकडे दुर्लक्ष करुन आपला व्यवसाय थाटला आहेत. अनेक बारला साधी सुरक्षा भिंतही नाही. चक्क जाण्यायेण्याच्या रस्त्यावर बारमध्ये येणाऱ्यांचे वाहन उभे ठेवून रहदारीला अडथळा निर्माण करीत आहेत. प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील बारमध्ये मुदतबाह्य दारु व सोडा विकल्या जात असल्याची माहिती काहींनी दिली आहे. दोन महिन्यापूर्वीच सोड्याची मुदत संपल्यावरही ते ग्राहकांना विकले जात आहे. सोड्याची किंमत १४ रुपये असून कच्या बिलात त्यांची किंमत ४० रुपये लावल्या जात आहे. काही बार मध्ये ६०० मिमी मुदतबाह्य सोड्याच्या एका बॉटलवर २६ रुपये जास्तीचे लावल्यात येत आहे. यापूर्वी अशा बारमधून मुदतबाह्य दारुची विक्री सुद्धा करण्यात आली आहे. बिल मागीतल्यास बारच्या नावे रबरी स्टॅम्प मारुन एका कागदाच्या चिटोऱ्यावर बील दिल्या जात असून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लुट केली जात आहे. यासंबंधात संबंधित अधिकाऱ्यांना माहित असूनही ते दुर्लक्ष करीत आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बाल मालकांवर त्वरित कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
ब्रह्मपुरीत मुदतबाह्य दारुची विक्री
By admin | Published: June 16, 2014 11:26 PM