चंद्रपूर : यावर्षी नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्याच्या उदरनिर्वाहाचाही पश्न बिकट झाला आहे. आर्थिक गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी आता स्वत: जवळील पशुधन विक्रीसाठी काढले आहे. यावर्षी कापूस, सोयाबीन पिकांना फटका बसला. उत्पादन यावर्षी मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टया पूर्णत: खचला आहे. काही सावकार आता कर्जवसुलीसाठी तगादा लावत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट आहे. शिवाय मूलांबाळांचा शिक्षणाचा खर्च व संसार चालवणे कठीण झाले आहे. सध्या नाईलाजाने आपल्याकडील पशुधन अत्यल्प भावात विक्री करत आहे. पाळलेले पशुधन विक्री करावे लागत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे. परंतु कर्जाचा वाढता डोंगर व उदरनिर्वाहासाठी त्याला नाईलाजास्तव आपल्याकडील बैल, गाय, म्हैस, वासरु आदींची विक्री करावी लागत आहे. जिल्ह्यात भरणाऱ्या बैलबाजारात हा धंदा सध्या तेजीत आहे. यात परप्रांतीय खरेदीदार सक्रीय झाले आहे. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जनावरे विक्रीसाठी त्यांना परावृत्त केले जात आहे. या खरेदीदारांनी आपला मोर्चा अतिदुर्गम भागातील गावखेड्याकडे वळवला असून जनावरांच्या विक्रीची सौदेबाजी मोठ्या प्रमाणात सुरु आहे.जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, जिवती, गोंडपिंपरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये परप्रांतीय खरीदीदारांनी गेल्या अनेक महिन्यापासूनच डेरा टाकला आहे. कोरपना तालुक्यातील दुर्गाडी, मांगलहिरा, शिवापूर, थिप्पा, येरगव्हाण, पारडी, कोठोडा, परसोडा, गोविंदपूर, पांडूगुडा, मेहंदी, राजुरा तालुक्यातील देवाडा, लक्कडकोट, वरुर, विरुर (स्टेशन), कोडाळा, बाबापूर, चंदनवाही, सुमठाणा, येरगव्हाण, जिवती तालुक्यातील धनकदेवी, परमडोली, पिट्टीगुडा, वणी (बु.), येल्लापूर, गडपांढरवणी, भारी, कुंभेझरी, सेवादासनगर, कोट्टा, सिंगारपठार आदी भागात जनावरांच्या विक्रीचा व्यवहार सध्या फोफावला आहे.या भागातील साप्ताहिक बैल बाजाराचे दिवशी मोठ्या प्रमाणात पशुधनाच्या विक्रीचे व्यवहार होत आहे. विशेष म्हणजे, बाजाराच्या दिवशी बैल खरेदी विक्री करताना पट्टी फाडणे गरजेचे आहे. असे असतानाही काही ठिकाणी बैल विक्रीची पट्टीही फाडण्यात येत नसल्याने हा व्यवहार फसवेगिराचाही होऊ शकते. (नगर प्रतिनिधी)
पशुधनाची कवडीमोल भावात विक्री
By admin | Published: December 31, 2014 11:23 PM