लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळ्यात जलजन्य व तत्सम आजारांमुळे जिल्हाभरात शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे. अशा स्थितीत काही औषध विक्रेते बिलाविना औषध विक्री करू शकतात. तसेच स्थानिक जनरल फिजिशियनकडूनही फार्मासिस्टप्रमाणे औषधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभाग तपासणीसाठी अलर्ट झाला आहे.
राज्यातील शेड्युल 'के' अंतर्गत येणारी अनेक औषधे काही स्थानिक डॉक्टरांकडून त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णांना विकली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही डॉक्टरही मेडिकल दुकानदारांप्रमाणेच मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा करून नियमांचे उल्लंघन करू शकतात. औषध खरेदीच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे. पावसाळ्यात रुग्णसंख्या वाढल्याने बिलाविना औषधांची विक्री होण्याचा धोका आहे.
अशी घ्यावी काळजी
- औषधे फार्मासिस्ट उपस्थित असलेल्या दुकानातूनच व फार्मासिस्टच्या सक्रिय देखरेखीत विकत घ्यावीत. प्रिस्क्रिप्शनप्रमाणे औषधाचे नाव, मात्रा (पॉवर) आहे ना, हे तपासावे. अंतिम मुदत, पॅकिंग तपासावे. फ्रेश मेडिसिनचा विनाकारण आग्रह करू नये.
- औषधाचे बिल जरूर घ्यावे. औषध संपेपर्यंत जपून ठेवावे. औषधाचा स्वस्त पर्यायी ब्रँड उपलब्ध आहे का, याविषयी फार्मासिस्टशी चर्चा करावी. औषधांचा डोस, वेळापत्रक, वापरण्याची पद्धत याविषयी डॉक्टर व फार्मासिस्टचे मार्गदर्शन घ्यावे.
काय आहे नियम ?औषध व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४५ अन्वये परवान्याशिवाय औषधसाठा करता येत नाही किंवा विकता येत नाही. त्यासाठी कडक नियम आहेत. मात्र, काही डॉक्टर औषधांचा साठा मोठ्या प्रमाणात ठेवतात. दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांव्य- तिरिक्त बाहेरून येणाऱ्या रुग्णांनाही औषधांची विक्री केली जाते. ते पूर्णतः बेकायदेशीर आहे.
मोहिम सुरू होणारकाही डॉक्टर मोफत मिळणाऱ्या औषधांच्या नमुन्यांची विक्री करू शकतात. या पार्श्वभूमीवर एफडीए आयुक्त (औषध) यांनी राज्यातील सर्व औषध निरीक्षकांना सहभागी असलेल्या डॉक्टरांच्या दवाखान्यात अचानक तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई व काही जिल्ह्यांत १ ते १४ ऑगस्ट या कालावधीत तपासणी करण्याच्या सूचना एफडीए प्रशासनाकडून निरीक्षकांना दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यातील नियमांचे कठोर पालन व्हावे यासाठी तपासणी मोहिम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
"औषधांची नियमांनुसारच विक्री करावी. जिल्ह्यातील रुग्णालये, स्थानिक जनरल फिजिशियन व फार्मासिस्ट आदींनी नियमांचे पालन करावे. कोणत्याही रुग्णाला बेकायदेशीर औषध पुरवठा होऊ नये, यासाठी विभागाकडून विशेष लक्ष दिले जात आहे. याचाच भाग म्हणून तपासणी केली जाणार आहे."- मनीष चौधरी, औषध निरीक्षक, चंद्रपूर