स्तुत्य उपक्रम : पाणी टंचाईत पाण्याचा अपव्यय टाळलाबाखर्डी : कोरपना तालुक्यातील बाखर्डी हे सुंदर व निसर्गरम्य गाव. मात्र सध्या या गावात पाण्याची टंचाई जाणवत आहे. माणसांबरोबरच पशुपक्षी आणि झाडांचाही जीव पाण्याविना कासाविस होत आहे. मात्र बाखर्डीवासी उन्हाच्या तडाक्यातही लहान झाडे जगवीत आहे. असे करताना सध्या मूल्यवान असलेल्या पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी झाडांना पाणी देताना चक्क सलाईनचा वापर केला जात आहे.बाखर्डी स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना या प्रकारे पाणी देऊन जगविले जात आहे. स्मशानभूमी परिसर झाडांनी बहरला असूनही उन्हाळ्यात झाडांचे केवळ सांगाडेच पहायला मिळतात. सध्या रस्त्याच्या दोन्ही कडेला नवीन झाडे लावण्यात आली आहे. मात्र पाणी टंचाई आणि उन्हाची तिव्रता यामुळे झाडांना पुरेसे पाणी मिळत नाही. थोड्या पाण्यात या झाडाना जगविण्यासाठी ठिंबक पद्धती वापरण्याची संकल्पना गुरुदेव प्रचारक बाखर्डी येथील रामदास तावीडे यांच्या डोक्यात आली. त्यांनी जुन्या टाकाऊ वस्तूपासून झाडांना पाणी पुरविण्याचा उपक्रम सुरु केला आहे. बाखर्डी येथील डॉ. हषर्निद हिरादेवे यांच्या दवाखान्यातील वापरलेल्या सलाईनच्या बाटल्या, रुग्णालयातून सलाईन नळ्या, सुतळीचे बंडल व काठ्या आणून या साहित्याचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. दोन लिटरच्या बाटलीत रोज सकाळी पाणी ओतले जाते. त्यातून झाडांना आवश्यक तितके पाणी मिळते. बाखर्डी येथील प्रवेशद्वारापासून ते गावापर्यंत व स्मशानभूमी परिसरात शंभराहून अधिक झाडांना सलाईनद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. गुरुदेव प्रचारक रामदास तावीडे यांच्या या उपक्रमाराद्वारे ही झाडे उन्हाळ्यातही हिरवीगार झाली आहेत. आणि पाण्याचा अपव्ययही टाळला जात आहे. आपला परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा, या उद्देशाने हा उपक्रम सतत कार्यान्वित राहणार आहे. यासाठी सर्व गावकऱ्यांचे सहकार्य मिळत आहेत. झाडे आपल्याला सावली देतात, आॅक्सिजन देतात, त्यांना आपण आधार द्यायला हवा, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे, असे रामदास तावीडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
झाडांना सलाईनचा आधार !
By admin | Published: May 26, 2016 2:09 AM