ब्रह्मपुरी : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून खून करणाऱ्या नराधाम आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, याकरिता संभाजी ब्रिगेड शाखा ब्रह्मपुरीतर्फे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी चंद्रपूर, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. सदर घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून त्याबाबत समाजात प्रचंड तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत अनेक आरोपींचा समावेश असून आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर पीडित कुटुंब दहशतीखाली वावरत असून पोलीस पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याऐवजी आरोपीच्या कुटुंबाला संरक्षण देत आहेत. सदर घटनेचा संभाजी ब्रिगेड शाखा ब्रह्मपुरीने तीव्र निषेध व्यक्त केला. प्रकरणाची जलदगतीने तपास होऊन कारवाई व्हावी, फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे घटनेत सामील सर्व आरोपीना तात्काळ अटक करण्यात यावी, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा तसेच या प्रकरणात सरकारी वकील डॉ. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आदी मागण्या करण्यात आल्या. पीडित कुटुंबियांना २५ लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात यावी व आरोपीच्या कुटुंबाकडून कोपार्डी गावात सतत दहशत निर्माण केली जाते. त्याद्वारे जातीय व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न झाले असून आरोपीचा पूर्वइतिहास तपासून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड शाखा ब्रह्मपुरीच्या वतीने निवेदनातून करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष महेश पिलारे, पत्रकार गोवर्धन दोनाडकर, संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष अंकुश मातेरे, संभाजी ब्रिगेड चौगानचे अध्यक्ष संतोष पिलारे, पराग राऊत, सुधीर पिलारे, परमानंद नंदेश्वर, धिरज देशमुख, रूपेश राऊत, गुरुदेव अलोने, प्रमोद आसटकर, आशिष नागदेवते, ऋषीकेत गोठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेडतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
By admin | Published: July 20, 2016 12:46 AM