वरोरा नाका ते पाण्याची टाकी
वरोरा नाका ते पाण्याची टाकी परिसरात रस्ता गुळगुळीत झाला आहे. परंतु, पाण्याच्या टाकीजवळ भर रस्त्यावर पार्किंग होत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी ट्रॅव्हल्स ऐन रस्त्यावर उभ्या केलेल्या होत्या. रस्ता रुंद असला तरी या ठिकाणी तो वाहनांच्या नियमबाह्य पार्किंगमुळे अरुंद वाटायला लागतो.
प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट
प्रियदर्शिनी चौक जटपुरा गेट रस्ता दुभाजक आहे. एकेरी वाहतूक होते. आधीच रस्ता अरुंद. त्यातही निम्म्या रस्त्यावर वाहने उभी केलेली असतात. यावर कुणाचाही वचक नाही.
जटपुरा गेट ते ज्युबिली हायस्कूल चौक
जटपुरा गेटमधून मुख्य शहरात प्रवेश केल्यानंतर वाहनधारकांना जिकिरीने वाहन चालवावे लागते. कुठेही पार्किंगची सुविधा नसताना दुतर्फा वाहने उभी केलेली असतात. दोन्ही बाजूंच्या उभ्या असलेल्या वाहनांमुळे उर्वरित रस्त्यावरून वाहने काढावे लागते.
श्रीकृष्ण टाॅकीज ते कस्तुरबा चौक
हाही मार्ग अरुंदच आहे. या मार्गाने जाताना कुठेही पार्किंगचे नियम पाळलेले दिसत नाहीत. निम्म्या रस्त्यावर वाहने उभी केलेली असल्यामुळे रस्ता अरुंद होऊन जातो. या भागात अनेक किरकोळ अपघात झालेले आहेत.
शहराचे हृदयस्थान गांधी चौकाची कोंडी कायमच
गांधी चौकातून कारागृहाकडे जाणाऱ्या मार्गावर सात मजली इमारतीसमोर उभ्या दुचाकीची रांग, लागूनच ऑटोच्या दोन रांगामध्ये पार्किंग केली जाते. यामुळे निम्म्यापेक्षा अधिक रस्ता पार्किंगमध्येच व्यापल्या गेल्याने उर्वरित मार्गावरून पायी जाणारे नागरिक आणि रस्त्याने जाणारी वाहने कशीबशी काढावी लागतात. या चौकातून पठाणपुराकडे जाणारा मार्गही दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या वाहनांमुळे अरुंद झालेला आहे. गांधी चौकातून जटपुरा गेटकडे जाणारा मार्ग आधीच अरुंद आहे. महानगरपालिकेने फुटपाथ तोडून रस्ता रुंद केला. मात्र, रस्त्याची कोंडी सुटलेली नाही. निम्म्याहून अधिक रस्ता उभ्या वाहनाने व्यापलेला असतो.
वाहनधारकांनाही नियमांचा विसर
चंद्रपूर शहरातील पार्किंगवर जिल्हा वा मनपा प्रशासनाला अद्याप तोडगा सापडलेला नाही. हे चंद्रपूरकरांना चांगलेच ठाऊक आहे.
याचाच फायदा चंद्रपुरातील वाहनधारक घेत आहेत. वाहन पार्किंग करायला जागा नसल्याचे पाहून दोन मिनिटांत येतो, असे कारण पुढे करून भररस्त्यावर वाहने उभी करून बिनदिक्कतपणे बाजारात जातात. त्या एका वाहनामुळे नेहमीच वाहतूक कोडींचा सामना करावा लागतो.
कोंडीकडे पोलीस व मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष
शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी पर्याय अद्याप मनपाला सापडलेला दिसत नाही. वाहतूक नियंत्रक पोलीस केवळ चौकात उभे राहण्यातच धन्यता मानत आहे. त्यांच्यासमोरच रस्त्यावर वाहने उभी असताना त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याचीही बाब पुढे आली आहे.