जयंत जेनेकर - वनसडी मराठी महाराष्ट्राची बोलीभाषा म्हणून सर्वपरिचित आहे. भाषेवरून प्रांतरचना झाली असली तरी सीमेपार अनेक राज्यात आजही विद्यार्थी मराठीतून शिक्षण घेत असल्याचे दिसते. महाराष्ट्र राज्यालगतच्या गुजरात, मध्यप्रदेश सीमेलगतच्या भागात विद्यार्थी मराठी भाषेचे धडे घेत आहे. आंध्र प्रदेशातही हीच स्थिती दिसून येत आहे. येथे एकट्या आदिलाबाद जिल्ह्यात मराठी माध्यमांच्या तब्बल ३७ शाळा आहेत. आंध्र प्रदेशातील हैदराबाद विद्यापीठात मराठी विभाग आजही कायम आहे. त्याचबरोबर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक पदव्युत्तर शिक्षण विद्यार्थी घेत आहेत. एकीकडे राज्यात मराठी शाळांची अवस्था दयनीय दिसून येत आहे. जि.प. शाळा व खासगी शाळांना विद्यार्थी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मराठी शाळांचे येत्या काही वर्षात काय होईल, असा प्रश्न भेडसावत आहे. दुसरीकडे मराठीच्या संवर्धनासाठी शासन पाऊल उचलत असून यासाठी निधीही देण्यात येत आहे. या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र - कर्नाटक भागात मराठी संवर्धनासाठी निधी दिला आहे. परंतु अद्यापही आंध्रप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांसाठी अशा प्रकारची तरतूद केली नसल्याचे दिसते. त्यामुळे अशी तरतूद करावी, अशी मागणी सीमेलगतचे नागरिक करताना दिसत आहे. महाराष्ट्राप्रमाणे सीमेलगत इतर राज्यातही मराठीचा गोडवा कायम आहे. आंध्र प्रदेशातील आदिलाबाद, कर्नाटकातील निप्पानी, कारवार, बेळगाव, मध्य प्रदेशात सौंसर प्रकाशगडुम या भागातील गावांमध्ये गेले की महाराष्ट्र राज्यात आहे की काय , असे तेथील लोकांच्या बोलीभाषेतून लक्षात येते. मराठी भाषेतील साहित्य संमेलने सातासमुद्रापलीकडे पोहचली आहे. आंध्र प्रदेशात तर मराठी भाषा परिषदांचेही आयोजन केले जात असते. यासाठी मराठी संवर्धनाची गरज असून सीमा भागात भाषा संवर्धन केंद्र स्थापन करण्याची गरज आहे. राज्याच्या सीमेलगत आजही अनेक मराठी भाषीक बहुसंख्येने राहतात. त्यांची संस्कृती वेशभूषा आणि व्यवसाय बघता इतर राज्यात मराठी संस्कृतीचे दर्शन घडते. त्यामुळे अशा भागात साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे.
सीमेपारही मराठीचा बोलबाला
By admin | Published: May 11, 2014 11:26 PM