कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. बाधितांच्या मृत्यूची संख्याही धडकी भरविण्यापर्यंत पोहोचली. कोरोना रुग्णांपासून इतरांना संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक चाचण्या वाढविण्यात आल्या. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोना कहर सुरू झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासनही हादरले. दरम्यान, राज्य सरकारने मंगळवारी ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत निर्बंध लागू केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा अंमबलबजावणी यंत्रणेला सूचना दिल्या. त्यामुळे किराणा, मेडिकल, जीवनाश्यक वस्तू व सेवांचा अपवाद वगळता सर्वच दुकाने बंद कराव्या लागल्या. बुधवारी दुसऱ्या दिवशीही चंद्रपूर शहरातील वर्दळीचा गोलबाजार बंद होता. मात्र, सार्वजनिक वाहतूक व ऑटो सुरू असल्याने रस्त्यावर धामधूम दिसून आली.
असंघटित मजूर अडचणीत
हातावर पोट असलेले असंघटित क्षेत्रातील कंत्राटी, कामगार, मजूर नाभिक, प्लंबर, भेळ-समोसा-वडा वगैरे रस्त्यावर, रेल्वे स्थानक व बसस्थानकावर विकणारे, फुलवाले, हमाल, मॉल, दुकानातील कामगार अनेक स्वयंरोजगार व मजुरी करणारे कामगार अडचणीत आले आहेत.
भाजी बाजारातील आवक घटली
चंद्रपुरातील मुख्य भाजी बाजारात दररोज शेकडो टन मालाची आवक होते. शासनाने भाजीबाजार व वाहतुकीला निर्बंध घातला नाही. मात्र, व्यापाऱ्यांनी माल उचलला नाही तर फटका बसेल या धास्तीने चंद्रपुरात भाजीपालाच आणला नाही. हा प्रकार असाच सुरू राहिला तर भाजीपाल्याची टंचाई निर्माण होऊ शकते.
व्यावसायिकांचे शुक्रवारकडे लक्ष
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दुकानांवर निर्बंध लागू केल्याने राज्यातील व्यापार उद्योग जगताची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजने मंगळवारी व्यापारी संघटनांची ऑनलाईन बैठक घेतली. यामध्ये चंद्रपूर चेम्बर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारीही सहभागी होते. राज्य सरकारने महाराष्ट्र चेंबरशी चर्चा करून निर्बंध आदेशात सुधारणा करावी, अन्यथा शुक्रवारपासून दुकाने सुरू करू असा इशारा देण्यात आला. त्यामुळे शुक्रवारच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत चंद्रपुरातील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत.