चंद्रपूर : जिवती तहसीलदाराने अवैधरित्या रेती तस्करी करणारे हायवा वाहन पकडले. जप्तीची कार्यवाही केल्यानंतर वाहन मालकाने दुसरी किल्ली व दुसरा चालक आणून वाहन पळविल्याची घटना जिवती तालुक्यातील शेणगाव परिसरात घडली. या घटनेने प्रशासनावर रेती तस्कर वरचढ झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी तहसीलदार प्रवीण चिडे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
तालुक्यातील शेणगाव-मरकागोंदी रस्त्यावर अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवून जिवतीचे तहसीलदार रितसर कार्यवाही करीत होते. अशातच वाहन चालक व मालकांनी शिवीगाळ करीत मुजोरीने रस्त्यालगत वाहन फसवून वाहतूक अडवली. तसेच जप्तीनामा भरून सुपुर्द करण्यात आलेले वाहनही रेती तस्कराने दुसरी किल्ली व दुसऱ्या चालकाच्या सहाय्याने पळविल्याची घटना घडली. या प्रकरणी वाहन मालक व वाहन चालकांवर कारवासाठी जिवती पोलिसात तहसीलदार प्रवीण चिडे यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.
प्रजासत्ताक दिन साजरा करून जिवतीचे तहसीलदार प्रवीण चिडे शेणगाव दौऱ्यावर होते. सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास शेणगाव-मरकागोंदी रस्त्यावर अवैधरित्या वाहतूक करणारे हायवा वाहन (क्रमांक एचएच ३४-एव्ही २८९१) आढळले. तहसीलदार चिडे यांनी वाहनाची चौकशी केली असता एकदिवसा पूर्वीची टी.पी. खोडतोड करून ती पुन्हा वापरात आणली असल्याचे लक्षात आले. वाहनात पाच ब्रास रेती होती.
तहसीलदार नियमानुसार कार्यवाही करीत असताना वाहन चालक कोंडिबा दत्ता मस्के व मालक सदाम शेख शेणगाव यांनी मुजोरीने वाहन सुरू केले आणि रस्त्याच्या बाजूला फसवून रहदारीचा रस्ता अडविला. तसेच तहसीलदारांना शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळे आणले. वाहन व रेतीचा नियमानुसार जप्तीनामा भरून वाहन शेणगाव पोलीस पाटील रमाकांत माने यांच्याकडे सुपुर्द केले होते. मात्र पोलीस पाटील वाहनापर्यंत येण्याआधीच वाहन मालकाने दुसरी चावी व दुसरा वाहन चालक आणून रेतीसह वाहन पळविले.