राजुरा : सध्या तालुक्यात रेती तस्करांना सुगीचे दिवस आले असून बहुतेक नाल्यात रेती चोरांनी धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांपासून एकाही रेती चोरट्यांवर कारवाई झाली नसल्याने त्यांना खुली सूट दिल्याचे दिसून येत आहे.
रेती तस्करांवर कारवाई करणारे पथक मात्र केवळ शोभेचे बाहुले बनले आहे. दरम्यान नलफडी नाल्यात रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने शहरातील रेती चोरट्यांनी तिथे धुमाकूळ घातला आहे. रेती उपस्यासाठी नाल्यात मोठमोठे खड्डे खोदण्यात येत असल्याने नाल्या काठावरच्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यात मागील महिन्यात वरूणराजाने कृपा केली आहे. त्यामुळे लहानमोठे नाले पाण्याने तुडुंब भरले. आणि याच पाण्याच्या प्रवाहामुळे नाल्यासह काठावर रेतीचा मोठा साठा जमा झाला आहे. सध्या याच नाल्यावर रेती तस्करांची मुजोरी पहायला मिळत आहे. त्यामुळे कारवाई अभावी महसूल जातो कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
बॉक्स
रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत होते रेती तस्करी
नलफडी नाल्यावरील रेती तस्करीची चांगलीच चर्चा केली जात आहे. सध्या या नाल्यावर राजुऱ्याच्या रेती चोरट्यांनी हल्लाबोल केला आहे. या तस्करांनी गावातील काही लोकांना हाताशी धरून अवाढव्य रेती उपसा सुरू केला आहे. या नाल्यावरुन रात्री ११ वाजेनंतर रेती चोरी केली जात आहे. पहाटे ५ वाजेपर्यंत चोरीचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. हा गोरखधंदा मागील काही दिवसांपासून सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
210821\img-20210820-wa0367.jpg
फोटो