चार दिवसांपासून बैठे पथकाचा पहारा : पथक जाताच तस्करी सुरू
बल्लारपूर : गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे मागच्या आठवड्यात बल्लारपूर तालुक्यातील बामणी टी पॉईंट व जुना बस स्टँड बल्लारपूर येथे तहसील कार्यालयाने चार दिवस बैठे पथक नियुक्त करून वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. परंतु, या पथकाच्या भीतीमुळे रेती तस्कर भूमिगत झाले आहेत.
चारही दिवस वाळू तस्कर आलेच नाही. त्यामुळे बैठे पथकाला एकाही वाळू तस्कराला न पकडता खाली हात परत यावे लागले. नंतर मात्र वाळू तस्करी पुन्हा सुरू झाली असून, शेतात रेती जमा असल्याचे निदर्शनास येत आहे.
बल्लारपूर तालुक्यात होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता वेळोवेळी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत व भरारी पथके कार्यरत आहे. तरीसुद्धा तालुक्यातील विविध ठिकाणांहून रात्री बेरात्री रेतीचे अवैध उत्खनन होत असल्याबाबतच्या तक्रारी तहसील कार्यालयास प्राप्त होत असतात. यावर पूर्ण आळा घालण्यासाठी तहसील कार्यालयाने मंडळ अधिकारी घनश्याम मेश्राम, तलाठी शंकर खरूले, रोहितसिंग चौहान, महादेव कन्नाके, महसूल सहायक प्रमोद अडबाले, जोगापूरचे पोलीस पाटील राजेश मोरे, मधुकर निरांजने, राजेश कोडापे, कळमनाचे कोतवाल पुंजाराम राऊत, अमोल डोंगरे व पोलीस शिपाई यांच्या पथकाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत निगराणी केली. परंतु, एकही वाळू तस्कर हाती आले नाही.
या पथकाने शेतात व झुडपात जमा असलेल्या रेती साठ्यांकडे मात्र साफ दुर्लक्ष केले असल्याचे निर्देशनास आले आहे.
बॉक्स -
शिवारात रेतीसाठा
दहेली बामणी, पळसगांव कोठारी अशा अनेक ठिकाणच्या शिवारात रेती साठा करून ठेवल्याचे निदर्शनात येत आहे. या परिसरात अधिक पाहणी केली असता जमा करून ठेवलेले रेती साठे आढळतात. परंतु, त्यांच्यावर कारवाई करण्यास हे पथक समोर येत नसल्याचा तक्रारी आहेत.