घुग्घुस : वर्धा नदीच्या विविध घाटावरून अवैध रेती उपसा व रात्रीच्या वेळेस मोठ्या संख्येने ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. लॉकडाऊनच्या काळात महसूल व पोलीस कर्मचारी कोविड नियंत्रणात व्यस्त असल्याचा फायदा घेत रेती तस्कर चांगलेच सक्रिय बनले आहेत.
वाहने गावातून जात असल्याने रेती तस्करीच्या वाहनांच्या आवाजाने लोकांची झोप उडाली आहे. दुसरीकडे पोलिसांच्या रात्रकालीन गस्तीदरम्यान अवैध रेती वाहतूक कशी दिसत नाही, हा चिंतनाचा विषय ठरला आहे.
अवैध रेती उपसा ही नवीन बाब नाही. या वर्धा नदीवर विविध घाट आहेत. एकाही घाटाचा लिलाव शासनाने मागील दोन वर्षापासून केलेला नाही. मात्र त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात अवैध मार्गाने रेतीचा उपसा होत आहे. पोलीस विभाग व शासनाने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले, तर महसूल विभागाने अवैध रेती थांबविण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. मात्र आजपर्यंत या कॅमेऱ्याचा उपयोग झाल्याची माहिती नाही.
बॉक्स
वाहनांची तपासणी नाही
शासनाने कडक लाॅकडाऊन सुरू केला आहे. त्यात जिल्हाबंदी आहे. मात्र या परिसरातील मुंगोली व बेलोरा एसएस टी पाईंटवर कोणत्याही वाहनांची तपासणी होत नसल्याने जिल्ह्यात कुठून कोण येतो व जातो, याचा थांगपत्ता लागत नाही. जिल्हाबंदी असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू वाहतूक होत आहे.
रात्रकालीन गस्त व अवैध रेती वाहतूक रात्रभर गावातून होत आहे. रस्त्यावरील गतिरोधकावरून ट्रॅक्टरच्या वाहतुकीच्या आवाजाने झोप उडाली आहे.
बॉक्स
ठाण्यासमोरूनच होते वाहतूक
घुग्घुस परिसरातील कोणत्याही रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तरी दिवसा पोलीस ठाण्यासमोरूनच पोलिसांच्या डोळ्यादेखत रेतीची ट्रॅक्टरच्या माध्यमातून वाहतूक होत आहे. रात्री पोलिसांची गस्त राहते. तेव्हाही सर्रास रेती वाहतूक होत आहे. हा प्रकार पोलीस प्रशासनाला दिसू नये, याचे नवल वाटते.