लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या दोन वर्षांपासून रेती तस्करी होत आहे. लाखोंचा दंड महसूल विभागाने वसुली केला असला तरी त्या प्रमाणात कितीतरी पटीने रेती चोरी झाली. घुग्घुसजवळील वर्धा नदीच्या नकोडा, घुग्घुस, घोडेघाट, नायगाव, चिंचोली घाटावरून सातत्याने रेतीचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीचे पात्र रुंद आणि खोल होत आहे. नदीपात्रातच खोल खड्डे पडले आहेत. यामुळे या ठिकाणच्या नदीचे अस्तित्व धोक्यात येऊ पाहत आहे. घुग्घुस परिसरातून वर्धा नदी वाहते. त्यात नकोडा, घुग्घुस, घोडेघाट, नायगाव व अन्य घाट आहेत. गेल्या दोन वर्षांपासून शासनाने या घाटांचा नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याच घाटांचा लिलाव केला नाही. तरीही घुग्घुस परिसरातील घाटावरून मोठया प्रमाणावर दिवसरात्र रेतीचा उपसा करून त्याची तस्करी केली जात आहे. लोडर, जेसीबीच्या साहाय्याने रेतीचा उपसा केला जात आहे. यामुळे वर्धा नदीचे नैसर्गिक पात्र बदलत चालले आहे. पात्र रुंद आणि खोल झाले आहे. नदीपात्रात खोल खड्डे पडले आहेत. यामुळे नदीचे अस्तित्वही धोक्यात आहे.
शेकडो ब्रास रेतीचा उपसा वर्धा नदीवरील नकोडा, घुग्घुस, घोडाघाट, नायगाव, चिंचोली असे विविध घाट आहेत. या घाटांवरून पे लोडर, जेसीबींच्या सहाय्याने रेतीचे दररोज उत्खनन केले जात आहे. मोठ मोठ्या हायवा ट्रक, ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक केली जात आहे. या घाटांवरून दररोज शेकडो ब्रास रेतीचा उपसा होत आहे. यातून अनेक रेती तस्कर गब्बर बनले आहेत. तरीही याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.
आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची असणार नजर पोलीस ठाणे, पटवारी व मंडळ आधिकाºयांच्या कार्यालयासमोरूनच रात्रंदिवस दररोज रेती तस्करी होत आहे. त्यामुळे पोलीस व महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर शंका व्यक्त केली जात आहे. आता दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्याच्या मुख्य गेटवर दोन सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून त्याची लिंक थेट तहसीलदार यांच्या भ्रमणसेवेला जोडण्यात आली आहे.
नदीपात्रातील रेतीचा अवैधपणे उपसा केल्यानंतर निशि्चतच नदीचे नैसर्गिक पात्र बदलते. ज्या भागातून रेतीचा उपसा केला जातो, त्या भागात पावसाळ्यात पाणी शिरते. त्यामुळे पुराचा धोका असतो. याशिवाय रेतीचा वारंवार उपसा केल्याने जलजन्य वनस्पती व किटके आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांवर परिणाम होत आहे.- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण तज्ज्ञ