लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : घरी कोणत्याही कलेचा वारसा नाही. परिस्थिती हलाखीची. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आत्मविश्वासाच्या बळावर त्याने सिनेसृष्टीत कलावंत म्हणून पाय ठेवला. ‘प्रेमाचा राडा’ या मराठी चित्रपटात तो भूमिका साकारतोय, मनातील जिद्द व चिकाटीने विसापूर येथील संदीप श्रीहरी पोडे याने चित्रपटात पदार्पण केल्याने पंचक्रोशीत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.विसापूर येथील संदीपचे वडील श्रीहरी पोडे प्लॉयवूडमध्ये काम करीत होते. मात्र कंपनी बंद पडल्याने त्यांच्या कुटुंबावर आपत्ती ओढावली. दरम्यान, आई चंद्रभागाने अंगणवाडी सेविकेचे काम करुन कुटुंबाला हातभार लावला. अशातच संदीपने बल्लारपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षण सुरू असतानाच त्याला पुणे येथील एका नृत्य संस्थेने बोलाविले. हिच संधी त्याच्या जीवनाला वळण देणारी ठरली. त्याच्या नृत्यकलेने साऱ्यांना भारावून सोडले.‘प्रेमाचा राडा’ चित्रपटाचे दिग्दर्शक अवधूत कराडे यांना त्याच्यातील नृत्यकलाविष्कार चांगलाच भावला. त्यानंतर त्यांनी संदीपला चित्रपटात संधी देण्याचा निर्णय घेतला. या संधीचे त्याने सोने करून आपला नृत्यविष्कारात ठसा उमटविला. ‘पे्रमाचा राडा’ या मराठी चित्रपटात तो रम्या नावाची भूमिका साकारत आहे. चित्रपट निर्माते मोहन घोडके यांनीही संदीपच्या अभिनय कौशल्याचे कौतुक केले आहे.
विसापूरच्या संदीपचे चित्रपटात पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 10:47 PM