हजारो बौद्ध व हिंदू बांधव रस्त्यावर : वनविभागाच्या गेटवर ठिया
चिमूर : ताडोबा व्याघ्रप्रकल्प व रामदेगी बफरझोन निर्मितीच्या अनेक वर्षापूर्वीपासून हिंदू आणि बौद्ध धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या संघरामगिरी- रामदेगी येथे हिंदू व बौद्ध धर्माच्या नागरिकांना धार्मिक कार्यासाठी जाण्यासाठी वनविभागाने बंदी केली आहे. त्यामुळे संघरामगिरी-रामदेगीच्या मुक्तीसाठी शेकडोंच्या संख्येने हिंदू आणि बौद्ध समाज भदंत महाथेरो ज्ञानज्योती यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून वनविभागाच्या विरुद्ध गुजगव्हान ते संघरामगिरी क्रांती मोर्चात सहभागी झाले.
३० व ३१ जानेवारीला झालेल्या धम्म समारंभास जिल्हाधिकारी यांची परवानगी असतानाही मंडप डेकोरेशनचे वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली होती. रामदेगी देवस्थानचे सचिव हनुमंत कारेकर यांनी वरोरा कोर्टात दाखल केलेल्या खटल्यात न्यायालयानेसुद्धा नागरिकांना परवानगी दिली. मात्र वनविभागाने न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान करीत नागरिकांना रामदेगी येथे जाण्यासाठी परवानगी नाकारली होती. या प्रकारामुळे हिंदू व बौद्ध बांधवात असंतोष पसरला होता. या असंतोषाचे रूपांतर शुक्रवारी क्रांती मोर्चात झाले.
यावेळी प्रा. जोगेंद्र कवाडे, कमला गवई, सुलेखा कुंभारे, राजू झोडे, वर्षा श्यामकुळे, डॉ. सतीश वारजूकर, सतीश पेंदाम, अरविद सांदेकर, हनुमंत कारेकर, सलीम शेरखान, गोविंदा महाराज आदी उपस्थित होते. यावेळी दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.