तूर खरेदीसाठी नोंदणी करावी
चंद्रपूर : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार तूर खरेदी सुरू करण्यासाठी नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील उत्पादकांनी तूर विक्रीसाठी आणण्यापूर्वी बाजार समितीच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समित्यांनी केले आहे.
शेतीपूरक योजना गावात पोहोचवा
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील नागरिक शेतीवरच अवलंबून आहेत. परंतु, यंदा अति पाऊस पडल्याने अनेकांची पिके वाया गेली. लागवडीचा खर्च निघाला नाही. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कृषी व अन्य विभागाच्या योजना गावात न आल्याने शेतकरी निराश आहेत. त्यामुळे दुग्ध व शेतीपूरक अन्य योजना आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अल्प उत्पादनामुळे आर्थिक कोंडी
चिमूर : तालुक्यात धानाची शेती केली जाते. परंतु, यंदा खरीप हंगामातील पिके वाया गेली. रब्बी हंगामातील पिकांचीही स्थिती समाधानकारक नाही. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून यंदा शेती केली. उत्पन्नात घट झाल्याने कर्जाचा भरणा कसा करावा, असा प्रश्न विचारला जात आहे. अवकाळी पाऊस आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केले. पण, मदत मिळाली नाही. त्यामुळे आर्थिक कोंडी झाली आहे.
नोकरभरती बंदीने बेरोजगारांमध्ये निराशा
वरोरा : शासनातील विविध विभागांमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या नोकरभरतीवर सरकारने बंदी घातली आहे. ग्रामीण भागात शाळा- महाविद्यालयांची संख्या वाढली. यातून हजारो विद्यार्थी पदवीधर होत आहेत. परंतु, कनिष्ठ पदे भरण्यासंदर्भात महाआघाडी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे बेरोजगार युवक-युवतींमध्ये प्रचंड निराशा निर्माण आहे.
गडचिरोली मार्गावर गतिरोधक तयार करा
सावली : सावली ते गडचिरोली या मुख्य मार्गावरील चौक परिसरात गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. हा वर्दळीचा मार्ग आहे. त्यामुळे दररोज किरकोळ अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक तयार करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुका मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत
चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघातांच्या घटना वाढल्या. अवैध प्रवासी वाहतूृकदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नवतळा मार्गाची दुरवस्था
चिमूर : तालुक्यातील जांभूळघाट-पिंपळगाव-नवतळा या आठ कि. मी. अंतराच्या मार्गाची पाच वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण उखडले. मोठे खड्डे पडले. या मार्गावरून प्रवास करणे अंत्यत कठीण झाले आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.
निर्माण नाला खोलीकरणाची मागणी
बाखर्डी : कोरपना तालुक्यातील लखमापूर ते निर्माण गाव शेजारी असलेल्या नाला गाळाने भरला आहे. सध्या मुबलक पाणी नाही. नाल्यातील गाळ काढून खोलीकरण करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
रस्त्यावरील वाहनांमुळे नागरिक हैराण
मूल : शहरातील रस्त्यावर वाहने पार्कींगसाठी ठेवली जात आहेत. त्यामुळे नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागत आहे. अधिकाºयांनी रस्त्यावरील पार्किंग दूर करण्याची मागणी केली जात आहे.