घनश्याम नवघडे नागभीड अनेक प्रथा परंपरा काळाच्या ओघात गडप झाल्या. पण या भागात धान रोवणीनंतर जो संस्कार केला जातो, तो काळाच्या कसोटीवर खऱ्या अर्थाने उतरला असून तो संस्कार आजही पूर्ण केला जात आहे. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. हे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक दिव्य पार पाडावे लागत असले तरी शेतकरी अतिशय श्रद्धेने ते पार पाडत असतो. याचा शेवट गोड, आनंदात आणि समाधानपूर्ण वातावरणात व्हावा, या हेतुनेच या संस्काराची प्रथा पडली असावी, असे बोलल्या जाते. ज्या शेतकऱ्यांचे रोवणे ज्या दिवशी संपते, त्या दिवशी रोवणी संपलेल्या बांधीतून डब्यांमध्ये चिखल घेतला जातो. डब्यामध्ये घेतलेला चिखल रोवणी करणाऱ्या महिलांकडून शेतमालकांच्या अंगावर उडविले जाते. तास अर्धा तास हा खेळ चालल्यानंतर रोवणी करणाऱ्या महिला शेतमालकाच्या घरी येतात. त्यानंतर अंगणात पाट ठेवण्यात येते. महिलांकडून शेतमालकाचे पाय धुण्यात आल्यानंतर ओवाळणी करण्यात येते. यावेळी शेतमालक भेट म्हणून काही रक्कम देत असतात. यानंतर शेतातून आणलेल्या चिखलाने शेतमालकाच्या घराच्या भिंतीवर, नागर, फण, धान्य ठेवण्याचे ढोले यांचे चित्र काढण्यात येतात. रोवणी करणाऱ्या महिलांकडून अक्षता लावून या चित्रांचेही पूजन केले जाते. पूजनाचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर शेतकरी रोवणी करणाऱ्या महिलांना आपल्या ऐपतीप्रमाणे नाश्ता किंवा जेवणाचा कार्यक़्रम ठेवत असतो. काही काही शेतकरी वनभोजन म्हणून शेतावरच जेवणाचे आयोजन करीत असतात.