चंद्रपूर : गुरुवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरूवात झाली. शुक्रवारी रात्रंदिवस आणि परत शनिवारी दिवसभर पावसाची झड कायम राहिली. आज शनिवारी २२१ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद सावली तालुक्यात झाली. यामुळे या तालुक्यात ८५ घरांची अंशता पडझड झाली असून दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत. चिमूर तालुक्यात भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील अनेक भागात नदी-नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद झाले आहे. लोअर वर्धा प्रकल्पाचे ३१ दारे उघडल्याने वर्धा नदीचे पाणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्व नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजतापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, मूल, सावली, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, भद्रावती, वरोरा, चिमूर या सर्व तालुक्यात एकाचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाची झड कायम होती. दिवसभरही पावसाने उसंत घेतली नाही. दिवसभर आणि रात्रीसुध्दा पावसाची रिपरिप सुरू असल्याने जिल्हाभरात जवजीवनावर मोठा परिणाम झाला. सध्या जिल्ह्यात कापूस आणि धान पिकांच्या जवळपास ९० टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक भागात पावसाची उसंत नसल्याने पेरण्या खोळंबल्याचे दिसून येते. शुक्रवारी आणि शनिवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना काहीच करता आले नाही. अडीच दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतांमध्ये तळे साचल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी एक-दोन दिवसांपूर्वी पेरणी केली. त्यांचे बियाणे पाण्यात राहून सडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नागभीड तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. तळोधी (बा) येथील बाम्हणी वार्डातील विश्वनाथ मानकर व श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले. त्यामुळे या भागातील श्रीकृष्ण मंदिरासमोरील बोअरवेल समोरील भागात पाणी साचल्यामुळे महिलांनासुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागले. या भागातील नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पऱ्हे पाण्यात बुडाले. परिणामी आतापासून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. तळोधी परिसरात दोन तासात १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. येनोली, मांगरूड व तळोधी(बा) येथील अनेक छोटे तलाव मोठे ओव्हरफ्लो झालेले असून नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. चिमूर तालुक्यातही पावसाची संततधार शनिवारी कायम होती. गुरुवारच्या मध्यरात्री पासून सुरुवात झालेल्या पावसाने प्रवाशाची वर्दळ कमी झाली. नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. प्रवाशाच्या अभावामुळे चिमूर आगारातून जाणाऱ्या अनेक बसफेऱ्या प्रवाशाअभावी रद्द करण्यात आल्या. याचा आर्थिक फटका चिमूर आगाराला बसला आहे. चिमूर तालुक्यातील एकमेव उमा नदी दुथडी भरून वाहत असून शहरा लगत बसस्थानक परिसरात असलेला सातनालासुद्धा तुडुंब भरून वाहत आहे.बल्लारपूर येथील कॉलरी मार्गावरील श्री टॉकीजजवळ असलेले प्रदीप भास्करवार यांच्या मालकीच्या जीर्ण घराचा काही भाग संततधार पावसामुळे कोसळला. उर्वरित भागही कोसळण्याच्या स्थितीत आहे. वर्धा नदीच्या पाण्याची पातळी तीव्र गतीने वाढत आहे. (लोकमत चमू)अनेक मार्ग बंदबालापूर रोडवरील बोकडडोह नाल्याला पूर आल्यामुळे शनिवारी आरमोरी-गांगलवाडी-मेंडकी-तळोधी (बा) मार्ग बंद झाला असून अनेक प्रवाशी तळोधी(बा) येथील बसस्थानकावर थांबले होते. तसेच तळोधी(बा) गायमुख रोडवरील नाल्याला पूर आल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मूल तालुक्यातील चिरोली-केळझर व भादुर्णी मार्ग बंद झाला आहे. यासोबतच मूल-चामोर्शी मार्गही बंद झाला आहे. कोरपना-परसोडा मार्गही शनिवारी पुलावरून पाणी असल्याने बंद झाला आहे. जनकापूर नाल्याला पूर असल्याने तळोधी ते नागभीड मार्गही बंद झाला आहे. सिंदेवाही तालुक्यातील मोहाडी-वासेरा मार्ग उमा नदीवरील पुलावरून पाणी असल्याने बंद आहे. राजुरा तालुक्यातील विरूर-चिंचोली मार्गही बंद आहे. मूल-मारोडा मार्गही शनिवारी सकाळपासून बंद झाला. कोरपना-आदिलाबाद मार्गावर झाड कोसळल्याने या मार्गावरीलही वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.भिंत पडून महिलेचा मृत्यूचिमूर तालुक्यातील तिरखुरा येथे शुक्रवारी पावसादरम्यान घराची भिंत कोसळून कमलाबाई बालाजी ढोणे (७०) या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. सदर महिला घरी काम करीत असताना अचानक अंगावर भिंत कोसळल्याने त्यात ती दबली गेली. यातच तिचा मृत्यू झाला.विद्यार्थ्यांची संख्या रोडावलीगुरुवारपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदी नाल्याचा जलस्तर वाढला आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणाकरिता जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र सतत पाऊस येत असल्याने तो रोडावली आहे.
दुसऱ्या दिवशीही संततधार
By admin | Published: July 10, 2016 12:34 AM