चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे प्रकरण नुकतेच घडले. मागील काही महिन्यांत जिल्हा बँकेतील संचालकांनी नोकरी लावून देण्यासाठी अनेक युवकांकडून पैसे घेतले आहेत. भविष्यात पुन्हा अशी घटना जिल्ह्यात घडू नये, यासाठी जिल्हा बँकेच्या सर्व संचालकांचीही नार्को टेस्ट करावी, अशी मागणी चंद्रपूर शहर-ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.
भविष्यात पुन्हा अशी घटना जिल्ह्यात घडू नये, यासाठी या सर्व संचालकांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याचेही तिवारी यांनी म्हटले आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. वेकोलित नोकरी लावून देण्यासाठी रावत यांनी पैसे घेतले. मात्र, नोकरी लावून दिली नाही आणि पैसेही परत केले नाहीत. यामुळेच रावत यांच्यावर हल्ला केल्याची कबुली अटकेतील आरोपीने दिल्याचे तिवारी यांनी पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे बँक संचालकांकडून फसवणुकीचे प्रकार घडल्यानंतर अशाच प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने सतर्क राहत बँक संचालकांची नार्को टेस्ट करावी, असेही तिवारी यांनी म्हटले आहे.