भद्रावती : तालुक्यातील बेलोरा येथे अरबिंडो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी इंग्रजी पत्राचा वापर करून सर्वेक्षण करून स्वाक्षरी करण्याचा प्रकार चालू केला होता. हा प्रकार टाकळी-बेलोरा या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच यांनी स्वतःच्या लेटरपॅडवर दिलेल्या अनुमतीने अरबिंडो कंपनी करत असल्याचा प्रकार उघड झाल्याने त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा याबाबतची तक्रार भद्रावती पोलिसांत दाखल केली आहे.
तालुक्यातील मौजा बेलोरा, टाकळी, जेना येथे केंद्र शासनाने कोल ब्लॉक मंजूर केलेला असून, त्या ब्लॉकचा लिलाव अरबिंडो कंपनीला देण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीने खदान चालू करण्याच्या हालचाली चालू केले आहे. ग्रामस्थांना तसेच ग्रामपंचायत सचिवाला कोणतीही माहिती न देता अरबिंडो कंपनीमार्फत नेमलेल्या विम्टा कंपनीने येथील सरपंच व उपसरपंच यांना हाताशी धरून त्यांच्या स्वतःच्या लेटरपॅडवर अनुमती घेतली व गावकऱ्यांना अंधारात ठेवून सर्वेक्षण करून स्वाक्षरी घेण्याचा प्रकार चालू केला. कंपनीकडून सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणारे पत्र इंग्रजीत असल्याने गावकरी यांच्यावर स्वाक्षऱ्या करत असल्याचा प्रकार येथील भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांच्या निदर्शनास आल्याने गावकऱ्यांच्या मदतीने तो हाणून पाडला.
या प्रकाराबाबत सरपंच संगीता देहारकर, उपसरपंच प्रवीण बांदूरकर व अरबिंडो कंपनीचे कर्मचारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार ५० नागरिकांच्या स्वाक्षरीनिशी भद्रावती पोलिसांत देण्यात आली आहे.
कोट
आम्ही सरपंच, उपसरपंचांनी कंपनीला आपल्या लेटरपॅडवर कोणतीही अनुमती दिली नाही. कंपनीचा सर्वेक्षणाचा प्रकार बघता आम्ही कंपनीला ग्रामपंचायतीमध्ये बोलावून चर्चा केली व ग्रामसभा लावून नागरिकांना याबाबत स्पष्ट माहिती द्यावी, असे सुचविले.
-प्रवीण बांदुरकर उपसरपंच,
टाकळी -बेलोरा गट ग्रामपंचायत.