उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देताना सरपंच संघटनेचे शिष्टमंडळ.
वरोरा : ग्रामपंचायत पथदिव्यांचे बिल पंधराव्या वित्त आयोग निधीमधून कपात करू नये, त्यासाठी शासनाने स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुका सरपंच संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
२३ जूनरोजी ग्रामविकास विभागाने १५ व्या वित्त आयोग निधीतून पथदिव्यांचे बिल भरण्याचा आदेश दिला. यामुळे गावाचा विकास करण्याकरिता निधी कमी पडतो. तालुक्यात अनेक लहान ग्रामपंचायती असून, पंधराव्या वित्त आयोग निधी पाच लाखांपर्यंतच मिळाला आहे. त्यामधून संगणक परिचालकाचे मानधन, कोरोना खर्च, महिला बालकल्याण अंतर्भूत इतर बाबींचा खर्च वगळता ग्रामपंचायतीला विकास निधी शिल्लक राहत नाही. विजबिल पाच ते दहा लाखांपर्यंत आहे. त्यामुळे वीजबिल अदा करण्याकरिता स्वतंत्र निधी देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पावडे, उपाध्यक्ष प्रवीण भोयर, महिला उपाध्यक्ष ऐश्वर्या खामकर, सचिव नितीन खंगार, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चिकटे, सल्लागार प्रकाश शेळके, सरचिटणीस अरुण बर्डे, महिला सरचिटणीस शुभांगी सातारकर, संघटक प्रफुल असुटकर, संदीप दडमल, रत्नमाला अहिरकर, विद्या खांडे, उज्वला थेरे आदी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रत संवर्ग विकास अधिकारी, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांनाही देण्यात आले.