लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ बु. : मासळ ग्रामपंचायतीवर आता नव्यानेच कारभारी निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. त्यामुळे नवीन आराखड्यात घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन, पाणी योजनेसाठी सोलर वीज पंप, कुषोषणमुक्ती, शाळांचे शौचालय, गावातील बोलक्या भिंती यासारख्या उपाययोजनांचा समावेश होणे आवश्यक आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक उपाययोजनेवर भर देणे फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती दरवर्षी ‘आमचं गाव आमचा विकास’ या अंतर्गत पुढील वर्षाचा विकास आराखडा तयार करतात. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी आराखड्याला निधी कमी प्रमाणात उपलब्ध झाला होता; मात्र आता काही प्रमाणात राज्यातील परिस्थिती सुधारल्याने अनेक प्रकारच्या योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतीला चांगल्याप्रकारे निधी मिळणार आहे तसेच ग्रामपंचायतींना केंद्राकडूनही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. या निधीचा वापर योग्य व चांगल्याप्रकारे होण्यासाठी या आराखड्यात विकासकामांचे नियोजन केले जाते.
ग्रामपंचायतीचा गाव विकास आराखडा तयार करताना २५ टक्के निधी आरोग्य, शिक्षण व उपजीविका, १० टक्के निधी महिला व बालकल्याण व उर्वरित निधी गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती - जमाती कल्याण उपक्रमावर खर्च करता येतो. दहा टक्केपेक्षा अधिक निधीचा वापर वैयक्तिक लाभाच्या उपक्रमावर करता येत नाही. येत्या पंधरा दिवसात हा आराखडा आता ई - ग्रामस्वराज्य पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे.