चंद्रपूर : इंग्रजी कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतनासह इतर सुविधा द्याव्या तसेच महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी माध्यम शाळा व अल्पसंख्याक कॉन्व्हेंट स्कूलमधील आर्थिक व्यवहार शासनाने तपासावे या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग व महाराष्ट्र राज्य शिक्षक पालक एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने १ मे महाराष्ट्र दिनी सत्याग्रह केला जाणार आहे. या आंदोलनात कॉन्व्हेंट शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा पालकांची उपस्थिती राहणार आहे.
महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यम शाळा, सीबीएससी, आयसीएसई, आयबी तथा स्टेट बोर्डाच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा पालकांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असल्याचा आरोप करीत हे आंदोलन केले जाणार आहे.कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन देण्यात यावे, महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रसूती पूर्व रजा वेतनासह द्यावा, शाळा सोडून गेलेले किंवा निवृत्त झालेले शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमानुसार पीएफ व ग्रॅच्युईटीचा लाभ द्यावा, कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना सीएल व ईएल तथा वैद्यकीय रजा नियमानुसार देण्यात याव्या, कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण घेत असलेल्या गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सरकारने राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू करावी, अल्पसंख्याक शाळेत आरटीई अंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अल्पसंख्याक शाळेचा अल्पसंख्याक दर्जा सरकारने नियमानुसार तपासून बघावा तसेच महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी माध्यम शाळा व अल्पसंख्यांक कॉन्व्हेंट स्कूल येथील आर्थिक व्यवहार शासनाने तपासावे आदी प्रमुख मागण्याचा यामध्ये समावेश आहे.जटपुरा गेट येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कॉन्व्हेंट शाळेतील सर्व शिक्षक-कर्मचारी तथा पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग व महाराष्ट्र राज्य शिक्षक पालक एकता मंचतर्फे विवेक आंबेकर, संजय उपाध्ये, किशोर मोहुरले, सुभाष भांडारकर, डॉ. प्रकाश रामटेके, ॲड. मेश्राम, देवीदास चौले, वडस्कर यांनी केले आहे.