प्यार फाऊंडेशन : म्हशीला केले मालकाच्या सुपूर्द
चंद्रपूर : तीन दिवसापासून वडगाव परिसरात चिखलात फसलेल्या म्हशीला येथील प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांनी रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून काढत मालकाच्या सुपूर्द केले. यामुळे म्हशीला जीवनदान मिळाले आहे. फाऊंडेशनच्या या कामामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
वडगाव परिसरातील भालचंद्र प्लाझासमोर असलेल्या चिखलामध्ये मागील तीन दिवसापूर्वी एक म्हैस फसली होती. चिखल जास्त असल्यामुळे तिला बाहेर पडता येत नव्हते. दरम्यान, चारा, पाण्याविना ती अशक्त झाली होती. मात्र मालकाने तिला मरण्याच्या दारात सोडून दिले होते. परिसरातील नागरिकांनी प्यार फाऊंडेशनच्या सदस्यांना यासंदर्भात फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर सदस्यांनी वेळ न दवडता तत्काळ घटनास्थळ गाठले. मात्र चिखल जास्त असल्यामुळे तिला काढणे कठीण झाले. तब्बल तीन तासाच्या अथक परि॰मानंतर तिला बाहेर काढण्यात सदस्यांना यश आले. यावेळी परसिरात नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान, म्हशीचा मालकही घटनास्थळी पोहचला. त्यानंतर त्याला समज देत तसेच तिची काळजी घेण्याचे सांगून म्हशीला त्याच्या सुपूर्द करण्यात आले.
चिखलातून म्हशीला काढण्यासाठी प्यार फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र रापेल्ली, आयुष झाडे, अभिषेक हनुमंते, अर्पित सिंग, कुणाल महल्ले आदी सदस्य सहभागी झाले होेते.
कोट
पशुपालकांनी आपल्या मालकीच्या जनावरांना मोकाट सोडू नये, जर मोकाट सोडायचे असेल तर त्यांच्या देखरेखीसाठी एखाद्या व्यक्तीला सोबत पाठवावे. आपल्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर जनावरांचा अपघात होत असून नाहक त्यांचा जीव जात आहे.
- देवेंद्र रापेल्ली
अध्यक्ष, प्यार फाऊंडेशन, चंद्रपूर
--